मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संसदेतील पंतप्रधान कार्यालयात जाऊन भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे 20 ते 25 मिनिटे चर्चा झाली. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. केंद्रीय तपास यंत्रणांकडून राज्यातील विविध नेत्यांवर सुरू असलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याचं सांगितलं जात आहे. मात्र या भेटीचा तपशील अद्याप समोर आलेला नाही.
मात्र, या दोन्ही नेत्यांच्या भेटीत काय चर्चा झाली. याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. या भेटीबाबत अजित पवारांनी संभाव्य कारण सांगितले आहे. या भेटीबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, बारा आमदारांचे नियुक्तीसंदर्भात आम्ही साहेबांना बोललो होतो, त्यानुसार त्यांनी ही भेट घेतली असावी, अशी प्रतिक्रिया या भेटीवर अजित पवारांनी दिलीय. गेल्या कित्येक महिन्यांपासून राज्यात बारा आमदारांच्या नियुक्तीचा मुद्दा रखडलेला आहे. राज्यपालांकडून या बारा आमदारांच्या नियुक्तीला ब्रेक लागला आहे. याबाबत आधीही अनेकदा चर्चा आणि भेटी झाल्या आहेत. मात्र अद्याप याबाबत तोडगा निघालेला नाही. त्यामुळे पवारांनी या आदारांच्या नियुक्तीबाबत थेट मोदींची भेट घेऊन चर्चा केली, असावी असे अजित पवार म्हणाले आहे.