संजय बियाणी हत्याकांड, मारेकऱ्यांच्या अटकेसाठी नांदेड एकवटलं

नांदेड : नांदेडमध्ये काल भरदिवसा प्रसिद्ध बिल्डर संजय बियाणी यांची राहत्या घराबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.  या घटनेने संपूर्ण नांदेड हादरलं आहे. याप्रकरणी दोषी असलेल्यांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी आता सर्वच स्तरातून करण्यात येत आहे.

 

संजय बियाणी यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे. तसेच बियाणी यांची अंत्ययात्रा संतप्त ग्रामस्थांनी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर रोखून धरली. या अंत्ययात्रेत नागरिकांचा मोठा जमाव एकत्र आला होता. यावेळी पोलिसांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. जोपर्यंत आरोपींना आणि त्यामागील सूत्रधारांना अटक होत नाही, तोपर्यंत अंतयात्रा पुढे नेणार नाही असा पवित्रा संतप्त जमावाने घेतला होता. अखेर अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांनी आश्वासन दिल्यानंतर अंतयात्रा पुढे नेण्यात आली आहे.

कोण आहेत संजय बियाणी?, काय आहे प्रकरण?

नांदेडमधील नागरिकांना स्वस्तात फ्लॅट देणारे म्हणून संजय बियाणी यांची ओळख होती. मागील आठवड्यातच त्यांनी 73 कुटुंबांना स्वस्तात घरे उपलब्ध करून दिली होती. तीन वर्षांपूर्वी कुख्यात गुंड रिंदा याने खंडणी वसुलीसाठी त्यांना धमकी दिली होती. तेव्हापासून त्यांना सुरक्षा देण्यात आली होती. मात्र तीन महिन्यांपूर्वीच त्यांची सुरक्षा काढून घेण्यात आली होती. हीच संधी साधत मारेकऱ्यांनी त्यांचा खून केला. खंडणीखोरांनीच संजय बियाणी यांची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

Share