‘तुम्ही तिकीटं काढा, मी काही खायला आणते’ म्हणत नववधू दागिने घेऊन पसार

औरंगाबाद : काही दिवसांपूर्वीच लग्न झालेले नवरदेव नवरी दौलताबाद किल्ला बघायला गेले. तिथे, ‘तुम्ही तिकीटं काढा, मी काही खायला आणते’ म्हणत नववधू ७० हजारांच्या दागिन्यांसह पसार झाल्याची घटना शहरातील दौलताबाद येथे घडली आहे. याप्रकरणी दौलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी सविस्तर माहिती अशी, खुलताबाद तालुक्यातील मावसाळा येथे राहणारा राजेश प्रकाश लाटे हा तरुण लग्नासाठी वधूच्या शोधात होता. राजेश वाळूज येथे एका कंपनीत काम करतो. काही दिवसांपूर्वी त्याची जळगाव जिल्ह्यातील बबन म्हस्के याच्याशी ओळख झाली. या मध्यस्थाच्या ओळखीतून एक मुलगी लग्नासाठी तयार असल्याचे सांगितले. त्यानंतर बबन म्हस्के याने त्याची ओळख अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथील आशाबाई भोरे (नवरीची मावशी) यांच्याशी करून दिली. या दोघांच्या मध्यस्थीने जळगाव जिल्ह्यातील प्रभाकर शिंदे यांची मुलगी शुभांगीसोबत राजेश लाटे याचा विवाह ठरला. यासाठी त्याला मुलीच्या नातेवाईकांना 1 लाख 30 हजार रुपये द्यावे लागले. सर्व सोपस्कार पार पाडल्यानंतर शुभांगीशी 26 मार्च 2022 रोजी राजेशने दौलताबाद येथील दत्तमंदिरात मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत लग्न पार पाडले.

दरम्यान, राजेशने शुभांगीच्या अंगावर 70 हजार रुपये किंमतीचे दागिने घातले होते. तसेच लग्नाचा संपूर्ण खर्चही केला होता. चांगली पत्नी मिळाल्याने सासरच्या मंडळींसह राजेशदेखील आनंदी होता. 27 मार्च रोजी हे जोडपे देवदर्शन करून आले. त्यानंतर 29 मार्च रोजी सत्यनारायणाची महापूजा झाली. त्यानंतर हे दोघे देवगिरी किल्ला पाहण्यासाठी गेले. तेथे गेल्यावर तुम्ही किल्ल्यात जाण्यासाठी तिकिटे काढा, मी काही खाण्याचे पदार्थ आणते, असे तिने सांगितले. बराच वेळ झाला शुभांगी परत येत नसल्याने राजेश मुख्य रस्त्याकडे आला. तेथील दुकानदारांना विचारपूस केली असता, ती एका बोलेरो गाडीत बसून गेल्याचे काही जणांनी सांगितले. या घटनेने पती आणि सासरच्या मंडळींना प्रचंड धक्का बसला.  नंतर राजेशने दौलताबाद पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दिली.

Share