औरंगाबाद : एमआयएमचे जिल्हाध्यक्ष समीर साजेद यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांविरोधात जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाण केल्याप्रकरणी शहरातील सिटीचौक पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयएमचेच माजी नगरसेवक विकास एडके यांनी दिलेल्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खडकेश्वर वॉर्डातून २०१५ मध्ये विकास एडके एमआयएमच्या तिकिटावर निवडून आले होते. दरम्यान ८ मार्च रोजी त्यांचे मित्र शासकीय कंत्राटदार सय्यद सलाउद्दीन यांना रात्री मारहाण झाल्याचे समजले. त्यांना मदतीसाठी एडके सिटीचौक ठाण्यात पोहोचले. त्याच वेळी समीर बिल्डर आणि एमआयएमचे पदाधिकारी मुन्शी पटेल काही सहकाऱ्यांसह तेथे दाखल झाले. त्यांनी सय्यद यांच्यासह एडकेंना तक्रार न देता बाहेर जाऊन बोलू, असे सांगितले. ठाण्याबाहेर येताच एडके यांना समीर बिल्डर यांनी जातिवाचक उल्लेख करत जिवे मारण्याची धमकी दिली असल्याचं विकास एडके यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे. तसेच, आरोपींनी आपल्याला तक्रार दिल्यास तुमचे हातपाय तोडून टाकू, अशी धमकी दिली होती. मुन्शी पटेल यांनी देखील जातिवाचक शिवीगाळ करून आमच्या विरोधात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलीस आम्हाला काहीही करू शकत नाहीत. त्यात तू दिलेल्या तक्रारीमुळे काय होणार, असे म्हणून पुन्हा जिवे मारण्याची धमकी दिल्याचे एडके यांनी फिर्यादीत म्हटले आहे.