साताराः महाराष्ट्राच्या मातीतील प्रतिष्ठेची ६४ व्या राज्य स्पर्धा महाराष्ट्र केसरी नुकतीच पार पडली असून अत्यंत अटीतटीच्या सामन्यात कोल्हापूरचा पैलवान पृथ्वीराज पाटील याने ५-४ च्या फरकाने मुंबई पश्चिमचे नेतृत्त्व करणाऱ्या विशाल बनकरला मात दिली आहे. विशेष म्हणजे जवळपास २१ वर्षानंतर कोल्हापूरला महाराष्ट्र केसरीची मानाची गदा मिळाली आहे. याआधी विनोद चौगुले यांनी महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली होती.
‘महाराष्ट्र केसरी’च्या अंतिम स्पर्धेत पृथ्वीराजने चार गुणांची पिछाडी भरून काढत पाच विरुद्ध चार असा मिळवलेला विजय त्याच्या लढाऊ वृत्तीचे व दृढ निर्धाराचे प्रतीक आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळ्याच्या पृथ्वीराज पाटील सैन्यदलात सेवा करीत आहे, त्याने जिंकलेल्या ‘महाराष्ट्र केसरी’ पुरस्काराने महाराष्ट्राच्या कुस्ती परंपरेचा गौरव वाढणार आहे. पृथ्वीराज पाटील, विशाल बनकर, पुण्याचा हर्षद कोकाटे, वाशिमचा सिकंदर शेख हे नव्या दमाचे पैलवान महाराष्ट्र कुस्तीची गौरवशाली परंपरा पुढे नेतील, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.
पृथ्वीराज पाटील
पृथ्वीराज पाटील, मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यामधील देवठाणेचा आहे. त्याने संजीवनीदेवी गायकवाड महाविद्यालयातून बारावीपर्यंत शिक्षण, मोतीबाग तालमीतून कुस्तीचा श्रीगणेशा, वस्ताद महान भारत केसरी दादू चौगुले, पैलवान संग्राम पाटील व धनाजी पाटील यांच्याकडून कुस्तीचे धडे घेतले. पृथ्वीराज पाटील ९५ किलो वजनी गटात ज्युनिअर वर्ल्ड स्पर्धेत कास्य पदकाचा मानकरी ठरला. पृथ्वीराज पाटील आर्मीत हवालदार पदावर कार्यरत आहे.
विशाल बनकर
विशाल बनकर, पूर्व मुंबईचे प्रतिनिधित्व करतोय. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील मांडवे गावात १९८७ रोजी विशाल बनकरचा जन्म झाला. विशाल महाराष्ट्र केसरी तानाजी बनकर यांचा पुतण्या आहे. गेल्या दहा वर्षांपासून कुस्ती क्षेत्रात आहे, सुरुवातीला भारत भोसले खवसपूर तालमीत ५ वर्ष प्रशिक्षण, मागील पाच वर्षांपासून कोल्हापुरातील श्री शाहू विजयी गंगावेस तालमीत प्रशिक्षण घेतोय. ९७ किलो वजनी गटात २०१८ व २०१९ च्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत विशाल बनकरने सुवर्णपदक पटकावले होते.
‘महाराष्ट्र केसरी’ची गदा मानाची, असा आहे इतिहास
कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद संस्थेअंतर्गत गेली सहा-सात दशकांपासून राज्यातील सर्वोच्च अशा ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. कुस्ती टिकावी, इथल्या मातीतून चांगले मल्ल तयार होऊन ते देश-विदेशातही चमकावेत, हा उद्देश या स्पर्धेचा असतो.
महाराष्ट्र केसरी ही देशातली मानाची कुस्ती स्पर्धा आहे. १९६१ मध्ये या स्पर्धेला सुरुवात झाली होती. आधी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेकडून मानाची गदा विजयी झालेल्या पहिलवानाला दिली जायची. कुस्तीत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मामासाहेब मोहोळ यांच्या निधनानंतर त्यांचे सुपुत्र अशोक मोहोळ यांनी आपल्या वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी ही चांदीची गदा देण्याची इच्छा व्यक्त केली. कुस्तीगीर परिषदेने त्याला मान्यताही दिली. आणि तेव्हापासून ही परंपरा आजतागायत सुरू आहे.
महाराष्ट्र केसरी ही माती व गादी (मॅट) विभाग मध्ये होते. यामध्ये माती विभागातील विजेता मल्ल व गादी विभागातील विजेता मल्ल यांच्यात महाराष्ट्र केसरी किताबाच्या मानाच्या ‘गदे’साठी लढत होते. या अंतिम लढतीतील विजेता मल्ल हा ‘महाराष्ट्र केसरी’ म्हणून घोषित होतो. त्याला महाराष्ट्र केसरीची मानाची गदा बहाल केली जाते.