पुतण्यांची फसवणूक करणा-या काकाला तीन वर्षांचा कारावास

 

नाशिक : भावाच्या सहा अल्पवयीन मुलींच्या नावे असलेल्या मुदत ठेवींवर पालनकर्ता म्हणून नाव असल्याचा गैरफायदा घेत काकाने मुदत ठेवीवर कर्ज उचलून फसवणूक केल्याप्रकरणी मुलींच्या काकाला न्यायालयाने तीन वर्षांचा कारावास आणि प्रत्येक पुतणीला ५० हजार ६०० रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. रघुनाथ लक्ष्मण ताजनपुरे (वय ६७ वर्षे, रा. चेहडी) असे आरोपी काकाचे नाव आहे.

नाशिक परिसरातील चेहडी येथील हरिश्चंद्र ताजनपुरे यांनी १९९५ मध्ये त्यांच्या सहा अल्पवयीन मुलींच्या नावे देवळाली बँकेत प्रत्येकी २५ हजारांची मुदत ठेव ठेवली होती. त्यावेळी या मुलींचे चुलते (काका) रघुनाथ ताजनपुरे याने मुलींना कोणतीही आर्थिक अडचण नसताना, बँकेत ठेवलेल्या मुदत ठेवींवर बँकेकडून ३ लाख २५ हजार रुपयांचे कर्ज घेतले. आपल्या नावाने बँकेत ठेवलेल्या मुदत ठेवीवर काकाने परस्पर कर्ज काढून फसवणूक केली असल्याचे मुलींच्या लक्षात आले. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात रघुनाथ ताजनपुरे यांच्यासह संशयित सुरेश ताजनपुरे व बँकेचे तत्कालीन अधिकारी यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणी पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. या प्रकरणात सरकारी पक्षाकडून अ‍ॅड. सुनीता चिताळकर यांनी युक्तिवाद करीत सहा साक्षीदार तपासले. साक्षीदारांची साक्ष व सबळ पुराव्यांच्या आधारे न्यायाधीश डी. डी. कर्वे यांनी आरोपी रघुनाथ ताजनपुरे यांना दोषी ठरवत तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आणि प्रत्येक पुतणीला ५० हजार ६०० रुपये देण्याचे आदेश दिले, तर सुरेश ताजनपुरे व बँकेच्या अधिकार्‍यांची या गुन्ह्यातून पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली.

Share