मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते तर आज चित्र वेगळे दिसले असते, असे वक्तव्य महाविकास आघाडी सरकारमधील महिला आणि बालकल्याणमंत्री तथा काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केल्याने आघाडीत मोठी खळबळ उडाली आहे. अमरावती येथे काल शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या एका कार्यक्रमात ठाकूर यांनी हे विधान करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घरचा आहेर दिला आहे. ठाकूर यांच्या या विधानामुळे महाविकास आघाडीतील धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर आल्याचे मानले जात आहे.
शरद पवार हे रविवारी अमरावती दौऱ्यावर होते. अमरावती येथील डॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात शरद पवार यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण व सभागृहाचे लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमास महिला व बालकल्याणमंत्री यशोमती ठाकूर, क्रीडामंत्री सुनील केदार आणि इतर नेते मंचावर उपस्थित होते. यावेळी बोलताना यशोमती ठाकूर म्हणाल्या, शरद पवारांसाठी काय आणि किती बोलावं. छोट्या तोंडी मोठा घास घेतेय. शरद पवार हे चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, पवार साहेब आज मुख्यमंत्री असते तर चित्र काही वेगळंच राहिलं असतं. पवार साहेब ही काळाची गरज आहे. कोणीही कितीही तीर मारले तरी महाराष्ट्र अस्थिर होणार नाही. महाराष्ट्र हा स्थिरच राहणार, असा विश्वासही ठाकूर यांनी व्यक्त केला.
पवारांना युपीए अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव मांडा -शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांचा टोला
दरम्यान, यशोमती ठाकूर यांच्या या वक्तव्यानंतर विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी काल रात्री उशिरा एक व्हिडीओ जारी करीत त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. “आज नामदार यशोमती ठाकूर यांनी अमरावतीमध्ये असं विधान केलं आहे की, शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते तर वेगळं चित्र दिसलं असतं. शरद पवार यांच्या कार्यक्षमता आणि नेतृत्वाबद्दल कुठली शंकाच नाहीय,” असे म्हणत, “मला तर वाटतं त्यांना युपीएचं अध्यक्ष करावं, म्हणजे सगळ्या भारतालाच उपयोग होईल,” असा टोला नीलम गोऱ्हेंनी लगावला आहे. “यशोमतीताई तुम्ही असा प्रस्ताव द्याल का?” असा प्रश्नही डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या व्हिडीओच्या माध्यमातून विचारला आहे. यशोमती ठाकूर आणि डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यातील या वादाची ट्विटरवर चांगलीच चर्चा रंगली आहे.