औरंगाबाद : जीवन जगण्याची प्रेरणा देणारे अष्टपैलू व्यक्तीमत्त्व म्हणजे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आहेत. त्यांच्या जयंतीदिनी त्यांच्या विचारांचा जागर करत समाजोपयोगासाठी प्रत्येकाने स्वत:च्या कार्याप्रती प्रामाणिक राहून जनसेवेचे काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमात जिल्हाधिकारी चव्हाण बोलत होते.
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी कार्यालयीन कामकाजात पारदर्शकता, गती आणण्यासाठी प्रत्येकाने सकारात्मकपणे पुढाकार घ्यावा. अष्टपैलू व्यक्तीमत्त्व असलेल्या डॉ. बाबासाहेबांनी सर्वच् क्षेत्राला स्पर्श करत देशासाठी महान असे कार्य केलेले आहे, ज्यामध्ये जलसंधारण, पाणी व्यवस्थापन, पर्यावरण, पंचायत राज व्यवस्था, कायदे आदींचा उल्लेख करता येईल. आपल्या देशाचा सर्व कारभार त्यांनी लिहिलेल्या भारतीय संविधानानुसार चालतो, यातूनच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अतुलनीय कार्याची प्रचिती आपणास येते. म्हणून प्रत्येकाने डॉ. बाबासाहेब यांच्या विचाराने प्रेरित होऊन वाचनाला प्राधान्य देत आपापल्या कार्याला परिपूर्ण करण्यासाठी आग्रही रहावे, त्यासोबतच कामाप्रती प्रामाणिकता असावी, असेही जिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले.