पिकअप-ट्रॅक्टरची धडक;दोन ठार

उस्मानाबाद : शनी शिंगणापूर येथून देवदर्शन करून परतणाऱ्या भाविकांच्या पिकअप गाडीला भीषण अपघात होऊन या अपघातात दोन भाविक जागीच ठार झाले, तर दहा जण गंभीर जखमी झाले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा-सोनारी रस्त्यावर खानापूर पाटीजवळ बुधवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. जखमींना परंडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

भूम तालुक्यातील वडगाव नळी येथील भाविक शनी शिंगणापूर येथे गेले होते. देवदर्शन करून कावड यात्रा घेऊन ते सर्वजण पिकअप वाहनाने गावाकडे परतत होते. परंडा- सोनारी रस्त्यावर खानापूर पाटीजवळ पिकअप गाडी आणि ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची धडक झाली. यात २६ वर्षीय मंगेश गायकवाड याच्यासह अन्य एका तरुणाचा मृत्यू झाला, तर पिकअपमधील इतर दहा भाविक गंभीर जखमी झाले. त्यांना परंडा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Share