युक्रेनच्या लष्करी कुत्र्याचं सर्वत्र कौतुक! चेर्निहाइव्हमध्ये शोधले १५० स्फोटकं

रशियाने युक्रेनवर हल्ला केल्याच्या घटनेला दोन महिने पूर्ण झाले आहेत. अजूनही रशिया युक्रेनमधील युद्ध संपलेलं नाही. २४ फेब्रुवारीपासून रशियाने युक्रेनवर हल्ला चढवला आहे. मात्र या युद्धात चर्चा आहे ती युक्रेनच्या लष्करी कुत्र्याची. कारण या कुत्र्यामुळे युक्रेन लष्कराला मोठी मदत झाली आहे. यामुळे युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयाने ट्विटरवर पॅट्रॉन नावाच्या सर्व्हिस डॉगचे आभार मानले आहेत. १५० हून अधिक स्फोटकं शोधल्याचा दावा ट्विटर पोस्टमध्ये करण्यात आला आहे.


पॅट्रॉन या सर्व्हिस डॉगने चेर्निहाइव्ह या युक्रेनियन शहराजवळ स्फोटक उपकरणे शोधून ते निकामी करण्याऱ्या टीमसोबत जवळून काम केले आहे. “पॅट्रॉन हा चेर्निहाइव्हमधील सर्व्हिस डॉग आहे. रशियन आक्रमण सुरू झाल्यापासून त्याने युक्रेनमध्ये १५० हून अधिक स्फोटकं शोधली आहेत. युक्रेनियन शहरे पुन्हा सुरक्षित करण्यासाठी डेमिनर्ससोबत काम करत आहे. तुमच्या सेवेबद्दल खूप खूप धन्यवाद!”, असं ट्वीट परराष्ट्र मंत्रालयाने केलं आहे.

सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन्स अँड इन्फॉर्मेशन सिक्युरिटीनेही ड्युटीवर असलेल्या पेट्रॉनचा व्हिडीओ शेअर केला असून त्याच्यावर एक दिवस चित्रपट बनवला जाईल, असे सांगितले आहे. “एक दिवस पेट्रॉनची कथा मोठ्या पडद्यावर दाखवली जाईल, परंतु सध्या तो आपलं काम कर्तव्ये निष्ठेने पार पाडत आहे,” असे ट्विटमध्ये म्हटले आहे.

Share