भाजपचे शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला

मुंबई : भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळाने आज राजभवन येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला झाल्यानंतर पोलिस प्रशासनाने केलेला अन्याय राज्यपाल कोश्यारी यांच्यासमोर शिष्टमंडळाने मांडला. तसेच राज्य सरकारकडून पोलिसांना हाताशी धरून कशा प्रकारे राज्यात दहशत निर्माण केली जात आहे, याबाबतची माहिती राज्यपालांना दिली.

राज्यपालांच्या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर अनेक घणाघाती आरोप केले. पोलिसांच्या उपस्थितीत किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला झालेला असताना पोलिस आयुक्त विचारतात की, सीआएसएफचे जवान काय करत होते? सीआयएसएफ जवानांनी तेव्हा गोळीबार करावा आणि महाराष्ट्र पोलिस व सीआयएसएफ जवानांमध्ये तुंबळ युद्ध व्हावे, अशी पोलिस आयुक्तांची अपेक्षा होती का? असा संतप्त सवाल प्रवीण दरेकर यांनी विचारला आहे.

किरीट सोमय्या यांच्या हत्येचा डाव
आम्ही गृहमंत्र्यांच्या भेटीसाठी गेलो असतो, मात्र सरकार न्याय देईल, असे आता आम्हाला वाटत नाही. हे सरकार सुडाने पेटलेले आहे. किरीट सोमय्या हे पुराव्यानिशी सरकारचा भ्रष्टाचार बाहेर काढत आहेत. त्यामुळे किरीट सोमय्या यांनाच नष्ट करा, असा डाव सरकारकडून आखण्यात आला होता, असा दावाही दरेकर यांनी केला आहे. राज्यपालांनी गृहसचिवांकडून या घटनेचा अहवाल मागवावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

पोलिस आयुक्त संजय पांडे यांची हकालपट्टी करा -सोमय्या
उद्धव ठाकरेंचे उद्धट सरकार आणि मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे बनवानवी करत आहेत. माझ्यावर हल्ला करणाऱ्या शिवसेनेच्या गुंडांना वाचविण्यासाठी पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी खोटा एफआयआर दाखल करून त्याआधारे कारवाई केली आहे. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने पोलिस आयुक्त संजय पांडे यांची हकालपट्टी करावी व त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.

माझ्यावर २३ एप्रिल रोजी झालेल्या हल्ल्यात पोलिस आयुक्त संजय पांडे यांच्या सांगण्यावरून खार पोलिस स्टेशनचे अधिकारी सहभागी झाले होते, असा आरोप सोमय्यांनी केला आहे. याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी आपण राज्यपालांकडे केली आहे. पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी कसा खोटा एफआयआर दाखल केला आणि खार पोलिसांना कारवाई करायला लावली याचे पुरावे राज्यपालांकडे दिले आहेत. खार पोलिसांनी मान्य केले आहे की, पोलिस आयुक्तांनी आमच्याकडे वांद्रे पोलिस स्टेशनचा एफआयआर पाठवला आहे ज्यामध्ये कोणाचीही सही नाही. हा एफआयआर अस्तित्वातच नाही, असा दावा सोमय्यांनी केला.

संजय पांडे उद्धव ठाकरेंची चमचेगिरी करतात
देवामुळे आणि कमांडोंमुळे मी आज इथे उभा आहे. संजय पांडे उद्धव ठाकरेंची किती चमचेगिरी करतात. कमांडोंनी मला वाचवले. काठ्या, दगड, काचेच्या बाटल्या, चपला आल्या तरी त्यांनी मला वाचवले. त्यांनी माझी गाडी बाहेर काढली. दगड लागल्याने काच फुटली आणि ती लागल्याने किंचित जखम झाली. पोलिसांनी त्याचा पंचनामा केला आहे. मी देवाच्या कृपेने वाचलो. ती काच डोळ्याला लागली असती तर…उद्धव ठाकरे आणि माफिया सेनेची मी जिवंत राहू नये अशी इच्छा होती का? असा सवाल सोमय्यांनी केला आहे.

Share