नवी दिल्ली : भारताचे माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या सेवानिवृत्तीनंतर लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांनी आज लष्करप्रमुख पदाचा पदभार स्वीकारला आहे. लेफ्टनंट जनरल मनोज पांडे हे २९ वे लष्करप्रमुख बनले आहेत. ते याआधी लष्कराचे उपप्रमुख म्हणून कार्यरत होते.
लेफ्टनंट जनरल मनोज पांडे हे मूळ नागपूरचे असून, त्यांच्या रूपाने चौथे मराठी अधिकारी लष्कराच्या प्रमुखपदी विराजमान झाले आहेत. मनोज मुकुंद नरवणे यांच्या सेवानिवृत्तीनंतर लष्करप्रमुखपदाची जबाबदारी लेफ्टनंट जनरल पांडे यांच्याकडे देण्यात आली आहे. जनरल मनोज पांडे १ फेब्रुवारी रोजी लष्कराचे उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला होता. त्याअगोदर ते आर्मी कमांडचे प्रमुख होते. त्यांना सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश सेक्टरमधील वास्तविक नियंत्रण रेषेचे (एलएसी) रक्षण करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. आता त्यांनी लष्करप्रमुखपदाचा पदभार स्वीकारला आहे.
लेफ्टनंट जनरल पांडे यांनी आपल्या कारकिर्दीत अंदमान आणि निकोबार कमांडचे कमांडर-इन-चीफ म्हणूनही काम केले आहे, जे भारतातील एकमेव तिन्ही संरक्षण सेवेमध्ये काम करणारे कमांडर आहेत. लष्करप्रमुखपदाची सूत्रे हातात घेतल्यावर आता त्यांना भारतीय नौदल आणि भारतीय हवाई दल यांच्याशी थिएटर कमांड्स रोल आउट करण्याच्या सरकारच्या योजनेवर समन्वय साधावा लागणार आहे.
मनोज पांडे यांची कारकीर्द
मनोज पांडे हे डिसेंबर १९८२ला राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए) व त्यानंतर इंडियन मिलिटरी अकदमीमार्फत (आयएमए) लष्करात अधिकारी झाले. त्यांना ‘इंजिनीअर’ या तांत्रिक लढाऊ विभागात स्वारस्य होते. त्यामुळे त्यांनी लष्करात राहूनच बी. टेक. ही पदवीदेखील घेतली. विविध जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर ते महत्त्वाच्या पूर्व कमांडचे प्रमुख होते. पूर्व कमांडमध्ये संपूर्ण ईशान्य भारताचा समावेश होतो. त्यानंतर १ फेब्रुवारीला त्यांनी भूदलाचे ४३ वे उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. त्यावेळी ते भूदलातील सर्वाधिक ज्येष्ठ अधिकारी असल्याने प्रमुख होतील, अशी अटकळ बांधली जात होती. त्यानुसार सध्याचे प्रमुख व मूळ पुण्याचे असलेले जनरल मनोज नरवणे हे आज ३० एप्रिलला निवृत्त होत असताना लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांनी पदभार स्वीकारला आहे.
लष्करात ‘लढाऊ आर्म’ व ‘सेवा आर्म’ असे दोन भाग असतात. पायदळ, रणगाडा व तोफखाना हे तीन प्रमुख लढाऊ आर्म असतात. या जोडीलाच ‘इंजिनीअर्स’देखील युद्धस्थितीत किंवा संकटसमयी सीमेवर उभे राहून शत्रूचा सामना करतात. त्यामुळेच ‘इंजिनीअर्स’ हेदेखील ‘लढाऊ आर्म’ म्हणून गणले जाते. लष्करात आजवर २७ पैकी २२ प्रमुख हे पायदळातील होते. या स्थितीत ‘इंजिनीअर्स’ना मनोज पांडे यांच्या रुपाने पहिल्यांदाच लष्करप्रमुखपदाची संधी मिळाली आहे.
लष्करप्रमुखपदी विराजमान होणारे मनोज पांडे हे चौथे मराठी अधिकारी
याआधी गोपाळ गुरूनाथ बेवूर (१६ जानेवारी १९७३ ते ३१ मे १९७५) व अरुणकुमार वैद्य (१ ऑगस्ट १९८३ ते ३१ जानेवारी १९८६) हे मराठी अधिकारी लष्करप्रमुख झाले होते. आता मनोज मुकुंद नरवणे यांच्यानंतर लेफ्टनंट जनरल मनोज पांडे हे चौथे मराठी अधिकारी लष्करप्रमुखपदी विराजमान झाले आहेत. उपप्रमुखांचा विचार केल्यास, लेफ्टनंट जनरल पांडे यांच्याआधी ४२ पैकी फक्त १० अधिकाऱ्यांना लष्करप्रमुख होण्याचा मान मिळाला आहे.