मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील सभेपुर्वी आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी राज ठाकरेंचा एक जूना व्हिडीओ शेअर करत टीकेची झोड उठवली आहे.
राज ठाकरेंचा तो व्हिडीओ व्हायरल
राज ठाकरे यांचा छत्रपती संभाजीराजेंवरील एक वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओत संभाजीराजे वडिलांशी (छ. शिवाजी महाराज) भांडून मोघलांना जाऊन मिळाले, असं राज ठाकरे म्हणत आहेत. ज्यांच्याविरोधात लढण्यात छत्रपती शिवाजी महाराजांची हयात गेली त्यांनाच संभाजीराजे जाऊन मिळाले,’ असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं होतं. महापालिका निवडणुकांसाठी मनसेने मुंबईत उभारलेल्या वॉर रूमच्या उद्घाटनावेळी राज ठाकरे बोलत होते. राम गणेश गडकरी पुतळ्यासंदर्भातल्या वादावर बोलताना राज ठाकरेंनी हे वक्तव्य केलं होतं.
राज ठाकरे आज छत्रपती संभाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक झाले. ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत दुसऱ्यांचे व्हिडीओ लावणाऱ्यांना आपण भूतकाळात काय बोललोय याची मात्र जाणीव नाही. छत्रपती संभाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक व्हायला आहात तर आता महाराजांच्या चरणी नाक घासून महाराष्ट्राच्या जनतेची माफी तेवढी मागा” अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रवीकांत वरपे यांनी केली आहे.