मे महिन्यात तापमान ५० अंशांच्या पुढे जाणार

नवी दिल्ली : देशाच्या अनेक भागात उष्णतेची लाट पसरली आहे. देशातील वाढत्या तापमानामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत असताना भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) मे महिन्यात उत्तर भारतातील तापमान ५० अंशांच्या वर जाऊ शकते, असा अंदाज वर्तवला आहे. आयएमडीचे महासंचालक डॉ. एम. मोहपात्रा यांनी उन्हाचा सध्याचा ट्रेंड पाहता हा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे आधीच उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना आता अधिक काळजी घ्यावी लागणार आहे.

वायव्य भारतात उष्णतेची लाट कायम आहे. वायव्य भारतातील अनेक राज्यांमध्ये पारा झपाट्याने वाढत असून, अनेक शहरांमध्ये तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. एप्रिलमधील वायव्य आणि मध्य भारतातील सरासरी कमाल तापमान अनुक्रमे ३५.९० अंश सेल्सिअस आणि ३७.७८ अंश सेल्सिअससह गेल्या १२२ वर्षांतील सर्वोच्च असल्याचे हवामान विभागाच्या शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. वायव्य आणि ईशान्य भारतातील काही भागांसह आग्नेय द्वीपकल्प वगळता भारताच्या बहुतांश भागात सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे आयएमडीचे महासंचालक डॉ. मृत्युंजय मोहपात्रा महापात्रा म्हणाले. त्याशिवाय मे महिन्यात पश्चिम-मध्य आणि वायव्य भारताच्या बहुतांश भागांमध्ये आणि ईशान्य भारताच्या उत्तर भागात सामान्य तापमानापेक्षा जास्त तापमान राहण्याची शक्यता असून, देशातील उर्वरित भागात तापमान सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.

https://twitter.com/Indiametdept/status/1520308902520565761?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1520308902520565761%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fpudhari.news%2Fnational%2F171899%2Fheatwave-breaks-122-years-record-in-india-said-india-meteorological-department%2Far

देशात यंदा मे आणि जून महिन्याची उष्णता एप्रिल महिन्यातच जाणवली. एप्रिल महिन्यात तापमानाचा पारा चढताच राहिला. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार एप्रिल महिन्यात देशाच्या मध्य तसेच उत्तर-पश्चिम भागात नोंदवण्यात आलेले तापमान गेल्या १२२ वर्षांमधील सर्वाधिक तापमान होते.

महाराष्ट्रासह उत्तर भारतात उष्णतेची लाट
हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार पुढील पाच दिवस विदर्भ, महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढील तीन दिवस पंजाब, दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेश, पूर्व राजस्थान आणि तेलंगणाच्या उत्तर भागाला उष्णतेच्या लाटेला सामोरे जावे लागू शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

दिल्लीत एप्रिल महिना ठरला ७२ वर्षांतील दुसरा सर्वात उष्ण महिना
दिल्लीसह भारताच्या उत्तर आणि पश्चिमेकडील राज्यांमध्ये तीव्र उष्णतेची लाट पसरली असून, राजधानी दिल्लीत ७२ वर्षांतील दुसरा सर्वात उष्ण महिना म्हणून एप्रिल महिन्याची नोंद करण्यात आली आहे. दिल्लीत एप्रिल महिन्यातील उष्णतेने ७२ वर्षांचा विक्रम मोडला असून, १९५० नंतर दिल्लीत एप्रिल महिन्यात एवढी उष्णता जाणवण्याची ही दुसरी वेळ असल्याचे हवामान विभागाचे म्हणणे आहे. यापूर्वी एप्रिल २०१० मध्ये दिल्लीत उष्णतेची तीव्र लाट आली होती.

Share