औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची काल औरंगाबाद येथे सभा पार पडली. या सभेत राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवारांवर टीकास्त्र सोडलं आहे.
राज ठाकरे म्हणाले की, पूर्वीही देशात जातपात होत्या. त्याचे राजकारणही केले जात होते. मात्र, जेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जन्म झाला तेव्हापासून देशात जातीपातीचे राजकारण मोठ्या प्रमणात केले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना हिंदू शब्दाची ॲलर्जी असल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला.
शरद पवार हे नेहमी सांगतात की, फुले-शाहू-आंबेडकर यांचा हा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र त्यांचा आहे. परंतु, आधी तो छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. फुले-शाहू-आंबेडकर हे शिवाजी महाराजांचा वारसा घेऊन पुढे गेले आहेत. मी शरद पवारांना नास्तिक म्हटल तर त्यांना झोंबले. त्यांची मुलगी सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत माझे वडील नास्तिक असल्याचे सांगितले होते, पवारांनी कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतले नाही. ते फक्त फुले-शाहू-आंबेडकर यांचे नाव घेतात. ते नेहमीच जातीपातीचे राजकारण करतात. मी जात मानत नाही. माझा जातीपातीत विश्वास नाही. मी कोणत्याही ब्राह्मण समाजाची बाजू इथे मांडण्यासाठी आलोला नाही, असेही राज ठाकरे म्हणाले.