आईसह दोन मुलींचा धरणात बुडून मृत्यू

अकोला : धरणाच्या सांडव्यात बुडून आईसह दोन अल्पवयीन मुलींचा मृत्यू झाल्याची घटना आज (२ मे) सकाळी अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील दगडपारवा येथे उघडकीस आली. म्हशीला पाण्यातून बाहेर काढताना एकमेकीला वाचवताना या तिघीही पाण्यात बुडाल्याने ही दुर्घटना घडली. सरिता सुरेश घोगरे (आई), वैशाली सुरेश घोगरे आणि अंजली सुरेश घोगरे (मुली) अशी मृत तिघींची नावे आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

बार्शीटाकळी तालुक्यातील दगडपारवा येथील सरिता सुरेश घोगरे (वय ४० वर्षे) आणि त्यांच्या दोन मुली अंजली सुरेश घोगरे (वय १६ वर्षे) आणि वैशाली सुरेश घोगरे (वय १४ वर्षे) या तिघी आपल्या म्हशीचा शोध घेण्यासाठी रविवारी (१ मे) दुपारी तीन वाजता घरातून बाहेर पडल्या. मात्र, रात्री उशिरापर्यंत त्या घरी परतल्या नाहीत. कुटुंबातील प्रमुख असलेले सुरेश घोगरे यांनी त्यांचा शोध घेतला. मात्र, या तिघींचा ठावठिकाणा लागला नाही. अखेर त्यांनी या संदर्भात बार्शीटाकळी पोलिस ठाण्यात या तिघी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली.

दगडपारवा येथील धरणाच्या सांडव्याच्या पाण्यात आज सोमवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास गावकऱ्यांना सरिता, अंजली आणि वैशाली या तिघी मायलेकींचे मृतदेह आढळून आले. यासंदर्भात पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन गावकऱ्यांच्या मदतीने या तिघी मायलेकींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले. यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी अकोला येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

मृत सरिता घोगरे आणि त्यांच्या दोन मुली रविवारी (१ मे) दुपारी म्हशी शोधण्यासाठी गेल्या होत्या. म्हशीला धरणाच्या सांडव्यातून बाहेर काढतानाच एकमेकीला वाचवताना तिघीही पाण्यात बुडाल्या. सुरुवातीला मोठी मुलगी अंजली ही पाण्यात बुडाली आणि तिला वाचवण्यासाठी गेलेली तिची आई सरिता आणि लहान बहीण वैशालीही पाण्यात बुडाली. यामुळे तिघींचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी सध्या अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेने घोगरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Share