पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मशिदीसमोर हनुमान चालीसा लावण्याच्या आदेशानंतर मनसैनिक राज्यभर आक्रमक झालेले आहेत. काल दिवसभर अनेक ठिकाणी पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांची धरपकड केली. दरम्यान या संपूर्ण आंदोलन काळात पुण्यातील मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे कुठेच दिसले नाहीत. या आंदोलनात ते नॉट रिचेबल होते. मात्र त्यांच्या नॉट रिचेबलची चर्चा रंगताच त्यांनी स्वतः त्या बाबतचा खुलासा केला आहे.
वसंत मोरे यांनी फेसबूक पोस्ट करुन आपण कुठे होतो याचा खुलासा केला आहे. पूर्व नियोजित कार्यक्रमामुळे मी तिरुपती बालाजीला आलो असल्याचं त्यांनी आपल्या फेसबूकच्या पोस्टमध्ये म्हटलं.
आपल्या फेसबूक पोस्टमध्ये काय म्हणाले वसंत मोरे म्हणाले की, पूर्व नियोजित कार्यक्रमामुळे मी तिरुपती बालाजीला आहे. पण मी सध्या पुणे शहराचे नाहीतर माझ्या प्रभागाचे नेतृत्व करतोय, साहेबांच्या आदेशानंतर मी माझ्या भागातील मस्जिद प्रमुखांसोबत लोकप्रतिनिधी म्हणून बोललो आणि त्या सर्वांनी माझी विनंती मान्य केली आणि आजची नमाज भोंग्याविना केली आणि भविष्यात ही सहकार्य करू असे सांगितले. म्हणून माझ्या प्रभागातील सर्व मुस्लिम बांधवांचे हार्दिक आभार…!,असं वसंत मोरेंनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं असून आपण तिरुपती बालाजीला असल्याचं स्पष्ट केलंय.