व्यंगचित्रकारांकडून भोंग्यांचे राजकारण; संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला

मुंबई : देशात बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा व्यंगचित्रकार पुन्हा निर्माण व्हावा, अशी आमची इच्छा आहे. तो देशातील एकाधिकारशाही आणि मनमानी कारभारावर आसूड ओढेल, अशी आम्ही नेहमी मनोमन प्रार्थना करतो. ज्यांच्यामध्ये ही क्षमता होती असे आम्हाला वाटायचे त्यांनी व्यंगचित्रकला सोडून भोंग्यांचे राजकारण सुरू केले आहे, अशी खोचक टिप्पणी करत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना खा. संजय राऊत म्हणाले, दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे उत्तम व्यंगचित्रकार होते. बाळासाहेबांच्या फटकाऱ्यांनी कोणालाही सोडले नाही. कुंचला आणि वाणी या दोन अमोघ शस्त्रांनी बाळासाहेबांनी महाराष्ट्रातच नव्हे तर देशात सत्ता परिवर्तन केले. ही कुंचल्याची ताकद आहे. म्हणून आजही आम्ही व्यंगचित्राच्या कुंचल्यापुढे कायम नतमस्तक होतो. विरोधकांवर टीका करण्यासाठी बाळासाहेबांना कधीही भोंग्याची गरज पडली नाही. बाळासाहेब ठाकरे यांची व्यंगचित्र कला पुढे जाईल होती, असे आम्हाला वाटले होते; पण दुर्दैवाने भाजपने त्या व्यंगचित्रकलेचा गळा घोटला आहे आणि महाराष्ट्रात आज वेगळंच चित्र दिसत आहे, असेही राऊत म्हणाले.

मनसेने सुरू केलेले भोंग्याचे राजकारण हिंदू समाजावरच बूमरँग झाल्याचे सांगून खा.संजय राऊत म्हणाले, भोंग्याच्या राजकारणामुळे कालपासून अनेक मंदिरांमध्ये काकड आरती झाली नाही. त्यामुळे अनेक हिंदू नाराज झाले आहेत. मशिदींवरील भोंग्यावरून सुरू झालेले राजकारण हे आता हिंदूंच्या गळ्यापर्यंत येऊन पोहोचले आहे, अशी टिप्पणीही त्यांनी केली.

महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेला चांगले यश मिळेल. कल्याण-डोंबिवली, मुंबई आणि नाशिक महानगरपालिकेत शिवसेना एकहाती सत्ता मिळवेल, असा दावाही खा. राऊत यांनी यावेळी केला.

Share