सचिन वाझे काही लादेन आहे का? भाजपचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल

मुंबई : सचिन वाझे काही लादेन आहे का? असा सवाल करत विधिमंडळात वाझेची पाठराखण करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आता थेट उत्तर दिले पाहिजे, अशी मागणी भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे. मनसुख हिरेन हत्या आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणात तुरुंगात असलेला माजी पोलिस अधिकारी सचिन वाझेवरून उपाध्ये यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

उपाध्ये यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत शिवसेनेवर गंभीर आरोप केले आहेत. सोशल मीडियावरील पोस्टमध्ये उपाध्ये म्हणतात की, मनसुख हिरेन यांची हत्या माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांनी केल्याची धक्कादायक माहिती ‘एनआयए’ च्या प्रतिज्ञापत्रातून समोर आली आहे. मनसुख हिरेन यांच्या हत्येची सुपारी सचिन वाझेने दिली होती, अशी माहितीही समोर आली आहे. सचिन वाझेप्रमाणेच प्रदीप शर्मा हेसुध्दा शिवसेनेमध्ये होते. त्यांनी निवडणूकही लढवली होती. त्यांचे शिवसेनेच्या अनेक नेत्यांसोबत घनिष्ठ संबंध होते.

https://twitter.com/keshavupadhye/status/1522058002966417409?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1522058002966417409%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Fmumbai%2Fbjp-keshav-upadhye-demand-explanation-of-cm-uddhav-thackeray-over-sachin-waze-pbs-91-2915558%2F

एका सामान्य पोलिस अधिकाऱ्याकडे एवढा पैसा आला कुठून?
राज्यात सत्ताधारी असलेल्या शिवसेनेशी संबंधित पोलिस अधिकाऱ्यांनी केलेला हा गुन्हा अधिकच गंभीर आहे. त्यात मनसुख हिरेनची हत्या करण्यासाठी सचिन वाझेने प्रदीप शर्मा यांना ४५ लाख रुपये दिल्याचीही माहिती समोर आली आहे. एका सामान्य पोलिस अधिकाऱ्याकडे एवढा पैसा आला कुठून, याचाही शोध घेतला गेला पाहिजे. तसेच हे दोघे पोलिस अधिकारी कुणाच्या इशाऱ्यावर गंभीर कृत्ये करत होते हेही समोर आले पाहिजे, असे केशव उपाध्ये यांनी म्हटले आहे.

बाकी प्रत्येक गोष्टीत महाराष्ट्राचा अपमान शोधणाऱ्या शिवसेनेच्या बोलघेवड्या नेत्यांनी शिवसेनेशी संबंध असलेल्या या पोलिस अधिकाऱ्यांच्या कृतीने पोलिस खात्याचा आणि राज्याचा सन्मान वाढला का, याचे उत्तर द्यावे, अशी मागणी केशव उपाध्ये यांनी केली आहे.

 

Share