असनी’ चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात दाखल

येत्या आठवड्याच्या सुरुवातीला बंगालच्या उपसागरात ‘असनी चक्रीवादळ’ घोंघावू शकतं, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. नैऋत्य हिंदी महासागरावरील कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळे चक्री वादळ येण्याची शक्यता असल्याचा अंदाज असून चक्रीवादळ नंतर बांगलादेश आणि लगतच्या उत्तर म्यानमारकडं सरकणार असल्याचीही माहितीही हवामान खात्याने दिली होती. दरम्यान, आता हे असनी चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात दाखल झाले असल्याने येथील नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
‘असानी’ चक्रीवादळ, पोर्ट ब्लेअर (अंदमान द्वीपसमूह) च्या पश्चिमेला सुमारे ३८० किलोमीटरने वायव्येकडे सरकणार असल्याने पुढील २४ तासांत ते पूर्व मध्य बंगालच्या उपसागरात त्याचे तीव्र चक्रीवादळात रुपांतर  होणार असल्याची माहिती आयएमडीने दिली आहे. काल बंगालच्या खाडीमधील कमी दाबाचे क्षेत्र अधिक तीव्र झाले होते. हे क्षेत्र उत्तर-पश्चिम दिशेने सरकत असून, त्याचे चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. दरम्यान, गेल्या मंगळवारी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं असून शनिवारपर्यंत ते पूर्व-वायव्य दिशेनं सरकण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. यानंतर हे वादळ अंदमान आणि निकोबार बेटांकडं जाईल, असं IMD नं नमूद केलं होतं.

Share