मुंबई सत्र न्यायालयाची राणा दाम्पत्याला नोटीस

मुंबई : तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर अपक्ष खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण न्यायालयाने राणा दाम्पत्याला जामीन देताना काही अटी-शर्ती घालून दिल्या होत्या. मात्र, या अटींचे उल्लंघन झाल्याचा दावा करत सरकारी पक्षाने न्यायालयात धाव घेतली होती.सरकारी वकील प्रदीप घरत यांनी ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर मुंबई सत्र न्यायालयाने राणा दाम्पत्याला नोटीस पाठवली आहे.

राणा दाम्पत्याला जामीन मंजूर करताना घालण्यात आलेल्या एकाही अटीचे उल्लंघन झाल्यास जामीन रद्द करण्याचे न्यायालयाने बजावले होते. असे असतानाही राणा दाम्पत्याकडून अटींचे उल्लंघन झाल्याचा दावा सरकारी वकिलांनी केली आहे. प्रसारमाध्यमांसमोर आरोपांशी संबंधित वक्तव्ये करू नयेत, अशी अट न्यायालयाने राणा दाम्पत्याला घातली होती. मात्र जामिनानंतर राणा दाम्पत्यांकडून माध्यमांसमोर विविध विधानं केली गेली आहेत. त्यामुळे या अटींचं उल्लंघन झालं असल्याचं सरकारी पक्षाचं म्हणणं आहे. या पार्श्वभूमीवर आता न्यायालयाने राणा दाम्पत्यास नोटीस बजावली आहे.

राज्य सरकारच्या अर्जात काय?

राज्य सरकारने दाखल केलेल्या अर्जानुसार, या दोन्ही आरोपींनी जामीन अटींचा भंग केला आहे. राणा यांनी माध्यमांशी बोलताना हनुमान चालिसेसाठी 14 दिवसच काय 14 वर्षांचा तुरुंगवासही सहन करण्याची तयारी असल्याचे वक्तव्य केले होते. त्याशिवाय, मला तुरुंगात डांबल्याचा परिणाम तुम्हाला (उद्धव ठाकरे) सहन करावा लागणार आहे. राम आणि हनुमान यांना विरोध केल्यास काय होऊ शकतं हे तुम्हाला कळेल. हिंमत असेल तर उद्धव ठाकरे यांनी कोणत्याही ठिकाणांहून निवडणूक लढवावी, मी तुमच्यासमोर निवडणुकीस उभी राहणार असल्याचे वक्तव्य नवनीत राणा यांनी केले होते. त्याशिवाय इतरही वक्तव्ये केले होते. या वक्तव्यांमुळे जामीन अटींचा भंग होत असल्याची तक्रार सरकारने कोर्टासमोर केली. त्यामुळे त्यांचा जामीन रद्द करून त्यांच्याविरोधात अजामीनपत्र वॉरंट काढण्याची मागणी सरकारी वकीलांनी केली.

Share