वकील गुणरत्न सदावर्ते यांची राजकारणात एन्ट्री

मुंबई : वकील गुणरत्न सदावर्ते यांनी राजकारणात एन्ट्री घेतली आहे. सदावर्ते यांनी एसटी कष्टकरी जनसंघ या संघटनेटी स्थापना केली असून त्यांनी याबाबत आज अधिकृत घोषणा केली.

गुणरत्न सदावर्ते यांनी आता राजकारणात एन्ट्री घेतली असून एसटी महामंडळ सहकारी बँकेच्या निवडणुकीत ते आपलं पॅनल उभं करणार आहेत. सध्या या बँकेवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचं वर्चस्व आहे. सोमवारी गुणरत्न सदावर्ते यांनी आपल्या नव्या एसटी कष्टकरी जनसंघ या संघटनेची घोषणा केली. तसंच एसटीच्या बँकेची निवडणूक हे पॅनल लढवणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान, ९५ टक्के कर्मचारी हे एस टी कष्टकरी जनसंघाचे सभासद असल्याचा दावा त्यांनी केला. भीतीमुळे एसटी बँकेची निवडणूक घ्यायची हिंमत होत नाही. निवडणूक कधीही घेतली तरी विजय आमचाच होणार असंही ते यावेळी म्हणाले.

कोण आहेत गुणरत्न सदावर्ते

गुणरत्न सदावर्ते हे मूळचे नांदेडचे आहेत. त्यांचं शिक्षण ओरंगाबाद आणि मुंबईतून झालं आहे. विविध सामाजिक चळवळींमध्ये ते नेहमीच पुढे असायचे. त्यांनी नांदेडला ‘सम्यक विद्यार्थी आंदोलन’ ही संघटना सुरू करुन या माध्यमातून विद्यार्थ्यांचे प्रश्न त्यांनी मांडले होते. पुढे सदावर्ते मुंबईत स्थायिक झाले आणि मुंबईत वकिली करू लागले. त्यांनी भारतीय राज्यघटनेवर पीएचडी केली आहे. मॅटच्या बार असोसिएशनचे ते दोनदा अध्यक्ष राहिले आहेत. ते बार कॉऊंसिलच्या शिखर परिषदेवर देखील होते.

मराठा आरक्षण असंवैधानिक असल्याची याचिका न्यायालयात दाखल करणाऱ्या  जयश्री पाटील या सदावर्ते यांच्या पत्नी आहेत. त्यांना झेन नावाची मुलगी आहे. २२ ऑगस्ट २०१८ रोजी परळच्या क्रिस्टल प्लाझा या इमारतीला आग लागली होती. त्यावेळी १० वर्षाच्या झेन सदावर्ते हिने तिथे अडकलेल्या लोकांना सावधगिरीचे उपाय सुचवले. त्यामुळे १७ जणांचे प्राण वाचले होते. तिच्या या कार्याबद्दल तिला राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला आहे.

Share