याचा हिशोब भाजपला द्यावा लागणार; विद्या चव्हाणांचा इशारा

मुंबई : भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केली, त्यांना मारहाण केली. या घटनेचा आम्ही धिक्कार करतो. भाजपच्या पुरूष पदाधिकाऱ्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी यांना थप्पड लगावली आहेच, पण ही थप्पड महागाईचा सामना करणाऱ्या राज्यातील तमाम महिला वर्गाला लागली आहे, अशी टीका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांनी केली आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी पुण्यात आलेल्या असताना त्यांना महागाईबाबतचे निवेदन देण्यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष वैशाली नागवडे गेल्या होत्या. इंधनाचे वाढलेले दर, गॅसची भाववाढ, अन्नधान्याची महागाई यामुळे गृहिणी अडचणीत असल्याचे या निवेदनात नमूद केले होते. लोकशाही मार्गाने निवेदन द्यायला गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांना भाजपच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली, त्यांचा विनयभंग करत श्रीमुखात भडकावली.

या घटनेचा निषेध करत असताना विद्याताई चव्हाण म्हणाल्या की, महागाईबाबत बोलणे चूक आहे का? एकेकाळी तुम्हीच महागाईवर आकाशपाताळ एक केले होते, मग आज महागाईबाबतचे निवेदन तुम्हाला का नको? भाजपला याचा हिशोब द्यायला लागेल. जर भाजपने माफी मागितली नाही, तर राज्यात प्रत्येक ठिकाणी महागाईवर भाजपला जाब विचारला जाईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०१४ साली मोठमोठी आश्वासने देऊन, महागाई कमी करण्याचे स्वप्न दाखवून सत्ता हस्तगत केली. पण आता महागाई आकाशाला भिडली असताना पंतप्रधान मोदी आणि भाजप गप्प आहे. उलट सदाभाऊ खोत यांच्यासारखे नेते कुठे आहे महागाई? असा निर्लज्ज प्रश्न विचारत आहेत. मोदी सरकार आल्यापासून संपूर्ण अर्थव्यवस्था कोलमडली आहे, बेरोजगारी वाढली आहे, रुपयाची किंमत घसरली आहे. अशा वेळी महागाईचे निवेदन देण्यासाठी आलेल्या महिला कार्यकर्त्यांना तुम्ही थप्पड मारता, असा सवालही विद्या चव्हाण यांनी केला आहे.

मग आता जनताच भाजपला थप्पड मारल्याशिवाय राहणार नाही. महागाई जर कमी केली नाही, तर संसदेच्या पुढच्या अधिवेशनात आम्ही थेट दिल्लीतच महागाईबाबत लाटणे मोर्चा काढू, असा इशारा विद्या चव्हाण यांनी दिला आहे.

Share