अभिनेत्री केतकी चितळेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत वादग्रस्त पोस्ट फेसबुकवर शेअर केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे हिला अटक केल्यानंतर तिची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली होती. तिची पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर तिला आज बुधवारी ठाणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर केतकीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. यानंतर गोरेगाव पोलिसांकडून तिचा ताबा घेतला जाणार आहे. दरम्यान, केतकी चितळे हिच्याकडून जामिनासाठी न्यायालयात अर्ज करण्यात आला आहे.

अभिनेत्री केतकी चितळे हिने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह भाषेत टीका करणारी एक कविता फेसबुकवर पोस्ट केली होती. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर केतकी चितळे हिच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. ही वादग्रस्त पोस्ट शेअर केल्याप्रकरणी केतकी चितळेविरोधात राज्यात जवळपास १५ वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सर्वप्रथम कळवा पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात केतकी चितळेला ठाणे पोलिसांनी गेल्या शनिवारी रात्री अटक केली होती. रविवारी केतकीला सुट्टीच्या न्यायालयात हजर केल्यानंतर तिने केलेल्या आक्षेपार्ह पोस्टबाबत अधिक तपास करण्यासाठी ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने पाच दिवसांची पोलिस कोठडी न्यायालयाकडे मागितली होती. न्यायालयाने केतकीला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती.

केतकी चितळेच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे तिला बुधवारी ठाणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने केतकीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट १ कडून केतकी चितळे हिची पोलिस कोठडीत कसून चौकशी करण्यात आली होती. पोलिसांनी तिच्या घरी जाऊन तिचा लॅपटॉप आणि अन्य काही वस्तू ताब्यात घेतल्या होत्या. केतकी चितळेचा मोबाईलही पोलिसांच्या ताब्यात आहे. तिच्या लॅपटॉप आणि मोबाईलची सायबर सेलकडून तपासणी करण्यात आली होती. त्याचा अहवाल ठाणे गुन्हे शाखेला सोपवण्यात आला आहे. मात्र, या अहवालातील नेमका तपशील अद्याप समोर येऊ शकलेला नाही.

दरम्यान, केतकी चितळे हिच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले आहेत. शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यावर इतक्या खालच्या भाषेत टीका करणाऱ्या केतकी चितळे हिच्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी केली जात आहे. राज्यात अनेक ठिकाणी केतकी चितळे हिच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे आता संबंधित ठिकाणच्या पोलिसांकडून केतकी चितळे हिचा ताबा मागितला जाऊ शकतो. त्यामुळे केतकी चितळे आणखी काही काळ तरी न्यायालयीन कोठडीत राहण्याची शक्यता आहे.

Share