वाराणसी : उत्तर प्रदेशमधील वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीमध्ये शिवलिंग आढळल्याच्या दाव्याच्या पार्श्वभूमीवर आज माजी कोर्ट कमिश्नर अजय मिश्रा यांनी वाराणसी न्यायालयात सर्व्हेचा अहवाल सादर केला आहे. या अहवालात ज्ञानव्यापी मशिदीच्या परिसरात पश्चिमेकडे असलेल्या भिंतीवर प्राचीन मंदिरांचा मलबा सापडला असून, त्यात देवी-देवतांच्या मूर्ती सापडल्याचा दावा करण्यात आला आहे.
१४ ते १६ मे दरम्यान करण्यात आलेल्या व्हिडीओ सर्वेक्षणाचा अहवाल आज वाराणसी कोर्टात सर्वेक्षणाचा अहवाल सादर करण्यात आला आहे. कोर्ट कमिश्नर विशाल सिंह आणि प्रताप सिंह यांनी हा अहवाल तयार केला असून एकूण १२ पानांचा हा अहवाल आहे. यात १ हजारहून अधिक फोटो आणि दोन ते अडीच तासांचा व्हिडीओ आहे.
वाराणसी न्यायालयाच्या आदेशानुसार माजी कोर्ट कमिश्नर अजय मिश्रा यांनी ६ ते ७ मे असे तीन दिवस ज्ञानवापी मशिदीचा सर्व्हे केला होता. मुस्लिम समुदायाने केलेल्या विरोधामुळे सर्व्हेचे काम थांबवण्यात आले होते. त्यानंतर मुस्लिम पक्षाने न्यायालयाकडे निरीक्षक अजय मिश्रा यांना हटवण्याची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने अजय मिश्रा यांना हटवण्याची मागणी फेटाळून लावली. त्याचबरोबर विशाल सिंह आणि अजय सिंह यांना कोर्ट कमिश्नर म्हणून नियुक्त केले. तसेच १७ मे रोजी ज्ञानव्यापी मशिदीच्या सर्वेक्षणाचा अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. मंगळवारी वाराणसी न्यायालयाने समितीला अहवाल सादर करण्यासाठी आणखी दोन दिवसांची मुदत दिली होती.
अजय मिश्रा यांनी ६ व ७ मे रोजी केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल कोर्टात सादर केला आहे. यावेळी ते एकटेच निरीक्षक म्हणून काम पाहत होते. यावेळी तिथे व्हिडीओग्राफीही करण्यात आली होती. त्यानुसार त्यांनी अहवाल तयार केला आहे. या अहवालात त्यांनी ज्ञानव्यापी मशीद परिसरात उत्तरेहून पश्चिमेकडे जाणाऱ्या मार्गावरील भिंतीवर शेषनाग व नागफणीसारख्या आकृती असल्याचा दावा या अहवालात केला आहे.
काय म्हटले आहे अहवालात ?
या सर्व्हेमध्ये उत्तर ते पश्चिमेकडील भिंतीच्या कोनाड्यात प्राचीन मंदिराचे अवशेष सापडले आहेत. ज्यावर देवी- देवतांची कलाकृती तयार करण्यात आली आहे. तसेच शिळांवर कमळाची चित्रेही सापडली आहेत, असे या अहवालात म्हटले आहे. दगडांवरीच असलेली कलाकृती निरखून पाहिल्यास त्यावर कमळ आणि अन्य आकृत्या असल्याचे लक्षात आले. उत्तर-पश्चिमच्या दिशेने गेल्यास तिथे एक सिमेंटचे व्यासपीठ बांधण्यात आले आहे. तसेच तिथल्या सर्व जागांचे व्हिडीओ सर्वेक्षण करण्यात आले आहे. शिळांवर देवी- देवतांच्या चार मूर्ती आहेत. ज्यावर शेंदूर फासण्यात आला आहे. चौथी आकृतीही मूर्ती सारखी दिसत असून, त्यावर शेंदूरचा लेप लावण्यात आल्यासारखे दिसून येत आहे. सर्व शिळा या जमिनीवर खूप काळापासून तशाच पडून असल्यासारखे वाटतेय. तसेच प्राथमिकदृष्ट्या एखाद्या मोठ्या सभागृहाचे भग्न अवशेष असल्याचे दिसून येतेय.
दरम्यान, ज्ञानवापी मशिदीमध्ये शिवलिंग आढळल्याच्या दाव्याच्या पार्श्वभूमीवर येथील सर्वेक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि पी. एस. नरसिंह यांच्या पीठाने महत्त्वपूर्ण आदेश देऊन, पुढील सुनावणी १९ मे रोजी ठेवली होती. सर्वोच्च न्यायालयातील आजची सुनावणीदेखील टळली आहे. आता उद्या शुक्रवारी सुनावणी होणार आहे.