‘व्हत्याचं नव्हतं अन् नव्हत्याचं व्हतं झालं’ ही म्हण पवारांनी प्रत्यक्षात आणून दाखवली : धनंजय मुंडे

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘व्हत्याचं नव्हतं अन् नव्हत्याचं व्हतं, ही मराठवाड्यातील म्हण प्रत्यक्षात आणून दाखवली आहे. त्यामुळे कुणाच्याही नादाला लागा; पण शरद पवारांच्या नको, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.

सोलापूर येथील गोकुळ शुगर्सच्या सांगता सभेत धनंजय मुंडे बोलत होते. यावेळी मुंडे यांनी भाजपवर हल्लाबोल करीत जोरदार फटकेबाजी केली.

याप्रसंगी मुंडे म्हणाले, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने लढवली. निकालामध्ये भाजप-शिवसेनेला बहुमत मिळाले. राष्ट्रवादीला ५४ जागा, काँग्रेसला ४४ जागा मिळाल्या. कुणाच्या स्वप्नात अन् ध्यानीमनीही नसतानाही ‘व्हत्याचं नव्हतं अन् नव्हत्याचं व्हतं झालं’. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चमत्कार झाला. त्यावेळी पवार साहेबांच्या नादाला न लागण्याचा सल्ला देवेंद्र फडणवीस यांना दिला होता; पण त्यांनी ऐकले नाही आणि ”व्हत्याचं नव्हतं अन् नव्हत्याचं व्हतं झालं’ ही म्हण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी प्रत्यक्षात आणून दाखवली, असे म्हणत मुंडे यांनी फडणवीसांना टोला लगावला.

गोपीनाथ मुंडे ऊस तोड कामगार कल्याण महामंडळाला निधीची तरतूद करण्यासाठी गाळप होणाऱ्या उसाच्या प्रत्येक टनाला कारखाना १० रुपये आणि सरकारकडून १० रुपये असे एकूण २० रुपये प्रमाणे निधी महामंडळाकडे जमा होणार आहे. हा निधी ऊसतोड कामगारांच्या मुलांचे शिक्षण, विमा, घर, आरोग्य आणि उपचारासाठी उपयोगात आणला जाणारा आहे, अशी माहिती धनंजय मुंडे यांनी यावेळी दिली.

Share