मुंबई : राज्यसभेची सहावी जागा अपक्ष लढवणार असल्याचं संभाजीराजे छत्रपती यांची काही दिवसांपूर्वी पुण्यातील पत्रकार परिषदेत जाहीर केलं होतं. यानंतर राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून राज्यातील राजकारण चांगलंच पेटलं आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. यावेळी संभाजीराजेंना शिवसेना बंधन बांधण्याचं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. यावर भाजपचे नेते निलेश राणे यांनी प्रतिक्रिया दिला आहे.
काय म्हणाले निलेश राणे?
निलेश राणे आपल्या ट्विटमध्ये लिहितात, “कोल्हापूरचे छत्रपती संभाजी, आज रात्रभर विचार करा की ज्या पक्षाने मूक मोर्चा ला मुका मोर्चा म्हणून खिल्ली उडवली, तुमच्याकडे महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे मागितले, औरंगजेबच्या कबरीला संरक्षण दिले, पक्षात १२ वाजता या सांगून तुमची काय किंमत ठेवली? लाथ मारा त्या खासदारकीला.” असे म्हणत भाजप नेते निलेश राणे यांनी संभाजीराजेंना आवाहन करणारे ट्विट केले आहे.
कोल्हापूरचे छत्रपती संभाजी,
आज रात्रभर विचार करा की ज्या पक्षाने मूक मोर्चा ला मुका मोर्चा म्हणून खिल्ली उडवली,
तुमच्याकडे महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे मागितले,
औरंगजेबच्या कबरीला संरक्षण दिले,
पक्षात १२ वाजता या सांगून तुमची काय किंमत ठेवली?
लाथ मारा त्या खासदारकीला.— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) May 22, 2022
शिवसेना दोन जागा लढविणार
राज्यसभेच्या सहापैकी दोन जागा लढविण्याचे शिवसेनेने जाहीर केले आहे. एका जागेवर संजय राऊत यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. भाजपच्या वतीने सहा वर्षांपूर्वी राज्यसभेवर संभाजीराजे यांची नामनियुक्त सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तेव्हाही संभाजीराजे यांनी अपक्ष म्हणूनच सहा वर्षे खासदारकी भूषविली. यावेळीही त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याची तयारी केली आहे. या जागेवर निवडून येण्यासाठी संभाजीराजे छत्रपती यांनी सर्वपक्षीय आमदारांना मदत करण्याचे आवाहन केले आहे.
संभाजीराजेंची भूमिका
संभाजीराजे छत्रपती हे शिवसेनेत प्रवेश करण्यास तयार नाहीत. याउलट महाविकास आघाडीकडील अतिरिक्त मते आपल्याला द्यावीत, असा प्रस्ताव त्यांनी शिवसेना व राष्ट्रवादीकडे दिला आहे. दुसरीकडे सहाव्या जागेसाठी शिवसेना कोणत्याही अपक्षाला पाठिंबा देणार नाही, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे, तर संभाजीराजेंनी शिवसेना प्रवेशाचा प्रस्ताव नाकारला आहे. त्यामुळे आता पुढे काय घडणार, संभाजीराजे कोणती भूमिका घेणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.