अपक्षाला पाठिंबा देणार नाही, मग तो कुणीही असो : संजय राऊतांचा संभाजीराजेंना थेट इशारा

मुंबई : राज्यसभा निवडणुकीतील सहाव्या जागेसाठी शिवसेना कोणत्याही अपक्षाला पाठिंबा देणार नाही. मग तो कोणीही असो. राज्यसभेच्या दोन जागांवर शिवसेनेचेच उमेदवार उभे राहतील आणि निवडून जातील, असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज सांगितले. संजय राऊत यांच्या या वक्तव्यामुळे शिवसेनेने आता संभाजीराजे छत्रपती यांना पक्षात आणण्याचा नाद सोडून आणखी एक उमेदवार रिंगणात उतरवण्याचे निश्चित केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता संभाजीराजे छत्रपती काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिवसेनेने राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संभाजीराजेंना पाठिंबा दर्शवण्याची तयारी दाखवली; पण त्यासाठी पक्षप्रवेशाची अट घातली. संभाजीराजेंनी मात्र ही ऑफर धुडकावून लावली आहे. त्यानंतर आता शिवसेनाही आपल्या भूमिकेवर ठाम आहे. कोणीही असला तरी अपक्षांना पाठिंबा देणार नाही, अशी भूमिका संजय राऊत यांनी मांडली आहे.

सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, अनेक वर्षे शिवसेना राजकारणात आहे आणि महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. सहा जागांसाठी राज्यसभेच्या निवडणुका होत आहेत. त्यातील दोन जागा शिवसेना लढत आहे. त्यातील दोन्ही ठिकाणी आम्ही शिवसेनेचे उमेदवार देऊ आणि निवडून आणू ही शिवसेनेची भूमिका आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यांनी ही घोषणा केली होती, त्याअर्थी त्यांनी जिंकून येण्यासाठी लागणाऱ्या ४२ मतांची बेगमी केली असावी, असा माझा समज होता; पण संभाजीराजे यांच्याकडे तेवढी मते नव्हती. तेव्हा संभाजीराजे यांनी शिवसेनेकडे मदत मागितली; परंतु आम्हाला आमचे २ उमेदवार निवडून आणायचे आहेत, मग आम्ही त्यांना आमची मतं कशी देणार? आम्हाला शिवसेनेला उमेदवार निवडून आणायचा आहे. राज्यसभेतील संख्याबळ वाढवायचे आहे. त्यामुळे आम्ही कोणत्याही अपक्षाला पाठिंबा देणार नाही.

आम्ही संभाजीराजे छत्रपती यांना शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवण्यास सांगितले. आम्ही एक पाऊल पुढे टाकले होते. संभाजीराजे छत्रपती यांनाही सांगितले की, तुम्हीही एक पाऊल पुढे या. शेवटी निर्णय त्यांचा आहे. आमचा कोणालाही विरोध नाही; पण राज्यसभेच्या दोन जागांवर कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेचेच दोन उमेदवार निवडून जातील. ही गोष्ट मी उद्धव ठाकरे यांच्या वतीने सांगत आहे, माझ्या मनातले काहीतरी सांगत नाही, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

आम्ही संभाजीराजेंच्या विरोधात नाही. त्यांना आमचा विरोध नाही; पण आम्हाला आमच्याकडे असलेल्या दोन्ही जागांवर फक्त कट्टर शिवसैनिक निवडून आणायचे आहेत आणि ते आम्ही आणू, अशी ठाम भूमिका राऊतांनी मांडली.

Share