गृहकर्ज महागले; ‘एसबीआय’ने आठवडाभरात दुसऱ्यांदा केली कर्जदरात वाढ

मुंबई : देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेने आज सोमवारी (२३ मे) गृहकर्जाच्या व्याजदरात तब्बल ०.५० टक्के इतकी वाढ केली आहे. आठवडाभरात दुसऱ्यांदा एसबीआयने कर्जदरात वाढ केली आहे. या दरवाढीनंतर बाह्यघटकांवर आधारित कर्जाचा दर ७.५ टक्के एवढा झाला आहे.

दोन आठवड्यापूर्वी भारतीय रिझर्व्ह बँकेने महागाई रोखण्यासाठी रेपो दरात अचानक वाढ केली होती. रिझर्व्ह बँकेने रेपो दर ०.४० टक्क्यांनी वाढवला होता. त्यामुळे बँकांकडून हा भार ग्राहकांवर लादला जाईल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केल्यानंतर त्याचे पडसाद बँकांवर उमटले आहेत. बँकांनी हा भार आता ग्राहकांवर लादण्यास सुरुवात केली आहे. गेल्या आठवड्यात काही बँकांनी कर्जदरात वाढ केली होती. आज (सोमवार) भारतीय स्टेट बँकेने (एसबीआय) कर्जदारांना मोठा झटका दिला.

आज एसबीआयने गृहकर्ज दरात ०.५० टक्के वाढ केली. एसबीआयच्या वेबसाईटनुसार बाह्यघटकांवर आधारित कर्जाचा दर (EBLR) ७.५ टक्के झाला आहे. रेपो दराशी संलग्न कर्जदर (RLLR) ६.६५ टक्के इतका वाढला आहे. यापूर्वी बाह्यघटकांवर आधारित कर्जाचा व्याजदर (EBLR) ६.६५ टक्के आणि रेपो दराशी संलग्न कर्जदर (RLLR)६.२५ टक्के इतका होता. येत्या १ जून २०२२ पासून नवे व्याजदर लागू होतील, असे बँकेने म्हटले आहे.

Share