कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद कराचीत; भाचा अलीशाह पारकरची ‘ईडी’समोर कबुली

मुंबई : ईडीच्या चौकशीत मोठा खुलासा झाला आहे. कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानमधील कराची शहरात असल्याची कबुली दाऊदचा भाचा अलीशाह पारकर याने ‘ईडी’समोर दिली आहे. अलीशाह हा दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरचा मुलगा आहे. दाऊदच्या ठिकाणासंदर्भात अलीशाह पारकरला प्रश्न विचारले गेले होते. त्यानंतर त्याने ‘ईडी’ला ही माहिती दिली आहे.

‘ईडी’ मनी लॉंड्रिंग प्रकरणी तपास करत आहे. या प्रकरणाच्या चौकशी दरम्यान अलीशाह पारकरचाही जबाब नोंदवण्यात आला आहे. अलीशाह पारकरने ‘ईडी’ला सांगितले की, ”दाऊद इब्राहिम पाकिस्तानमधील कराचीत आहे. मात्र, माझा दाऊदसोबत कोणताही संपर्क नाही. मात्र, दाऊदची बायको महजबीनने सणांच्या काळात माझ्या बायकोशी आणि बहिणीशी संपर्क केला होता.”

मनी लॉंड्रिंग प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून तुरुंगात असलेल्या राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचे दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचे पुरावे कोर्टाला मिळाले होते. मुंबईतील गोवावाला कम्पाऊंडची जागा हडप करण्यासाठी दाऊदच्या टोळीची थेट मदत घेतल्याचे पुरावे कोर्टासमोर सादर करण्यात आले होते. त्याचबरोबर याआधी ‘ईडी’ने कोर्टात सादर केलेल्या चार्जशीटमध्ये नवाब मलिकांचे थेट दाऊदशी संबंध असल्याचे म्हटले होते. दाऊदची बहीण हसीना पारकर आणि त्यांच्या वारंवार बैठका होत होत्या. गोवावाला कम्पाऊंडला हडप करण्यासाठी त्यांच्या बैठका होत होत्या. त्यासाठी त्यांनी एक माणूसही नेमला होता, असे पुराव्यांच्या आधारे समोर आले होते. त्यानंतर ‘ईडी’ने चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या हसीना पारकरच्या मुलाने म्हणजे अलीशाह पारकरने दाऊद कराचीमध्ये असल्याचा दावा केला असून तो त्याच्या कुटुंबीयाशी संपर्क करत असल्याची माहिती अली शाह याने दिली आहे. त्यामुळे नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.

राजकारण्यांचे दाऊद कनेक्शन

दरम्यान, मागील काळात अनेकदा राजकारण्यांचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचे आरोप झाले आहेत. यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांपासून अनेकांवर असे आरोप झाले. आता असेच आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यावर झाले आहेत. विशेष म्हणजे यावेळी केवळ आरोपच झाले असे नाही, तर विशेष न्यायालयाने ‘ईडी’ने सादर केलेल्या पुराव्यांवरून प्रथमदर्शनी मलिकांचे दाऊद कंपनीशी संबंध असल्याचे निरीक्षण नोंदवले. यानंतर भाजपने राष्ट्रवादीवर टीकेची झोड उठवली. या टीकेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रत्युत्तरदेखील दिले होते. शरद पवार म्हणाले, न्यायालयाने नवाब मलिक आणि दाऊद इब्राहिमबाबत जे सांगितले ते मत आहे, तो न्यायालयाचा निकाल नाही. न्यायालयाचा यावर अंतिम निर्णय येईल तेव्हा आम्ही त्यावर बोलू. मी अनेक वर्षे नवाब मलिक यांना ओळखतो. मला खात्री आहे की, त्यांचा दाऊदशी कोणताही संबंध नाही. माझ्यावरही अनेकदा असेच आरोप झाले होते. काही लोकांनी तशी अनेकदा टीका-टिपण्णी केली होती. शेवटी ज्यांनी आरोप केले होते त्यांच्या हातात सत्ता आल्यानंतर त्यांनी विधिमंडळात भाषण करून सांगितले की, आम्ही जी टीका केली त्यात काही तथ्य नाही. आम्ही विरोधासाठी विरोध म्हणून बोलत होतो.

न्यायालयाने नेमके काय म्हटले होते….
विशेष न्यायालयाचे विशेष न्यायाधीश राहुल एन रोकडे यांनी म्हटले होते की, आरोपी नवाब मलिक यांनी डी कंपनीचे सदस्य असणाऱ्या हसीना पारकर, सलीम पटेल आणि सरदार खान यांच्यासोबत गुन्हेगारी कट रचून मुनीरा प्लंबर यांच्या नावे असणारी संपत्ती बळकावली. मलिक यांनी दाऊदची दिवंगत बहीण हसीना पारकरच्या आणि इतर सहकाऱ्यांच्या मदतीने जमीन बळकावल्याने त्यांच्याविरोधात मनी लॉंड्रिंगविरोधी कायद्याअंतर्गत कारवाई करता येईल. या सर्वांनी या गुन्ह्यांतून मिळणारे उत्पन्न हे बेकायदेशीर कृत्यांमधून मिळवले आहे, असेही न्यायालयाने म्हटले.

Share