राज्यात ३० हजार कोटींची गुंतवणूक -उद्योगमंत्री सुभाष देसाई

मुंबई : जागतिक आर्थिक परिषदेदरम्यान विविध देशातील २३ कंपन्यांनी सुमारे तीस हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले. याद्वारे राज्यात सुमारे ६६ हजार जणांना रोजगार मिळेल, असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी व्यक्त केला.

आज झालेल्या विविध गुंतवणूक करारांमध्ये ५५ टक्क्यांहून अधिक गुंतवणूक सिंगापूर, इंडोनेशिया, अमेरिका आणि जपान आदी देशांतील आहे. यामध्ये प्रामुख्याने औषध निर्माण, वस्त्रोद्योग, अभियांत्रिकी, पॅकेजिंग, पेपर पल्प व अन्न प्रक्रिया, स्टील, माहिती तंत्रज्ञान, डेटा सेंटर, लॉजिस्टिक इ. क्षेत्रांचा समावेश आहे.

दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये महाराष्ट्र पॅव्हेलियनमध्ये सामंजस्य करार करण्यात आले. सिंगापूर, इंडोनेशिया, अमेरीका आणि जपानसारख्या देशातून थेट परकीय गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार झाले असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.

महाराष्ट्राकडून डावोसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम येथे 23 सामंजस्य करार करण्यात आले. यामध्ये इंडोरामा, मायक्रोसॉफ्ट आदी कंपन्यांचा समावेश आहे. पुण्यात  मायक्रोसॉफ्टच्यावतीने  डेटा सेंटर सुरू करण्यात येणार आहे. सामंजस्य कराराच्या वेळी राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त सचिव आशिष कुमार सिंह,  उद्योग विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव बलदेव सिंह, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अनबलगन आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र कुठे होणार गुंतवणूक?
मायक्रोसॉफ्ट कंपनी पुण्यात डेटा सेंटर सुरू करणार आहे. त्यासाठी ३२०० कोटींची गुंतवणूक करणार आहे. राज्यातील नागपूर आणि कोल्हापूर या वस्त्रोद्योग केंद्रामध्ये इंडोरामा कॉर्पोरेशन आणि इंडोकाउंट इंडस्ट्रीज लिमिटेड आदी प्रमुख वस्त्रोद्योग कंपन्या गुंतवणूक करणार आहे. इंडोनेशियातील आशिया पल्प अॅण्ड पेपर (एपीपी) कंपनी रायगडमध्ये जवळपास १० हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. ही कंपनी लगदा आणि कागद उत्पादन करते. इंडोनेशियातील ही आघाडीची कंपनी आहे. त्याशिवाय, हॅवमोर आईस्क्रीम्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी पुण्यात आईस्क्रीम तयार करण्यासाठी युनिट सुरू करणार आहे.

Share