७०० रुपयांसाठी मुलानेच केली आई-वडीलांची हत्या; पुंडलीकनगरातील दाम्पत्याच्या हत्येचे कोडे उलगडले

औरंगाबाद : शहरातील पुंडलीकनगर भागात काल दि.२३ रोजी कलंत्री दाम्पत्याचे घरात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळले होते. धारदार शस्त्राने निर्घृण खून करून मृतदेह पलंगाच्या खाली लपवून आरोपी घराला बाहेरून कुलूप लावून फरार झाला होता. या खुनांचा उलगडा करण्यात पोलीसांना यश आले आहे. मुलानेच केवळ ७०० रुपयांसाठी आई-वडिलांचा खून केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. आरोपी मुलगा आकाश कलंत्री यास शिर्डी येथे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, पुंडलिक नगर येथे शामसुंदर हिरालाल कलंत्री (५५) यांचे दुकान आहे. शनिवारी मुलगा किरण याने हिशोबात घोळ केल्याचे वडील शामसुंदर यांच्या लक्षात आले. त्यांनी हिशोबात कमी असलेले ७०० रुपयांचा जाब मुलगा आकाशला विचारला. यातून बाप-लेकात वाद झाले. यामुळे संतापलेल्या आकाशने वडिलांची धारदार शस्त्राने हत्या केली. यावेळी घरी असलेल्या सावत्र आई किरण (४५) यांना देखील आकाशाने संपवले. यानंतर दोघांचे मृतदेह वेगवेगळ्या मजल्यावर पलंगाच्या खाली लपवून तो फरार झाला होता. पोलिसांनी तांत्रिक तपास करत आकाशचे लोकेशन ट्रेस केले. तो शिर्डी येथे असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी लागलीच याची माहिती शिर्डी पोलिसांना दिली. शिर्डी पोलिसांनी कारवाई करत आकाशला ताब्यात घेतले आहे.

Share