केतकी चितळेला अ‍ॅट्रॉसिटी प्रकरणात ७ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट लिहिल्याप्रकरणी चर्चेत आलेल्या मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिला अ‍ॅट्रॉसिटी प्रकरणात आज (मंगळवार) ठाणे येथील विशेष सत्र न्यायालयाने पंधरा दिवस म्हणजे ७ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

केतकी चितळेने १ मार्च २०२० रोजी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली होती. यात तिने अनेक धर्मांचा उल्लेख केला होता. यात तिने नवबौद्धांविषयी तिची मते मांडली होती. केतकी चितळेने नवबौद्धांविषयी फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी तिच्याविरोधात नवी मुंबईतील रबाळे पोलिस ठाण्यात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (अ‍ॅट्रॉसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात केतकीला पोलिसांनी २० मे रोजी अटक करून ठाणे येथील विशेष सत्र न्यायालयात हजर केले होते. त्यावेळी तिला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. पाच दिवसांची पोलिस कोठडी संपल्याने पोलिसांनी आज तिला न्यायालयात हजर केले होते. त्यानंतर ठाणे सत्र न्यायालयाने केतकीला ७ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट लिहिल्याप्रकरणी केतकी चितळेला ठाणे न्यायालयाने १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. न्यायालयीन कोठडी दिल्यानंतर तिच्या वकिलांकडून जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र, न्यायालयाने तिला दिलासा देण्यास नकार दिला आहे. या जामीन अर्जावर येत्या २६ मे रोजी सुनावणी होणार आहे.

केतकीने शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट फेसबुकवर शेअर केली होती. तसेच या पोस्टमध्ये संत तुकाराम महाराज यांच्या नावाचा उल्लेख करून बदनामी केली होती. या प्रकरणाचे संपूर्ण राज्यभरात तीव्र पडसाद उमटले. सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी याचा निषेध केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या तक्रारीवरून राज्यात अनेक ठिकाणी केतकीवर गुन्हेदेखील दाखल करण्यात आले आहेत. कळवा, पुणे, पिंपरी-चिंचवड, धुळे, सिंधुदुर्ग, अकोला, मुंबईतील गोरेगाव, पवई, नाशिक, अमरावती, पिंपरी चिंडवड आदी ठिकाणी केतकी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत तिच्या विरोधात दाखल झालेल्या एकाही गुन्ह्यामध्ये तिला जामीन मिळालेला नाही. त्यातच आज रबाळे (नवी मुंबई) पोलिस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटी कायद्यान्वये दाखल गुन्ह्यात केतकीस न्यायालयीन कोठडी मिळाल्याने तिचा ताबा अन्य ठिकाणी दाखल असलेल्या गुन्ह्यांत पोलिस घेतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Share