भोंग्यांविरोधात आता मनसेची पत्र मोहीम, पदाधिकारी मेळाव्यात राज ठाकरेंच्या सुचना

मुंबई : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पक्षाची रणनिती आखायला सुरुवात केली आहे. मनसे सध्या मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी आक्रमक झाली आहे. राज ठाकरे देखील हिंदुत्वाच्या मुद्यावरून आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे. दरम्यान, काल दि,२८ रोजी मुंबईतील रंगशारदा सभागृहात मनसेचा पदाधिकारी मेळावा पार पडला. या मेळाव्यात राज ठाकरे यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. तसेच नवीन पत्रमोहीम हाती घेण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुकारलेल्या भोंग्याविरोधातील आंदोलनाची आगामी भूमिका निश्चित करताना, पक्षाकडून नवी पत्रमोहीम हाती घेण्यात येणार आहे. या आंदोलनाची पुढील दिशा आणि राज यांची भूमिका या पत्रात असणार असून, मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तीन भाषांमध्ये हे प्रसिद्ध केले जाणार आहे. पदाधिकाऱ्यांनी स्वत: जाऊन हे पत्र घराघरांत पोहोचवण्याचे आदेश राज यांनी दिले आहेत. याशिवाय मनसेतर्फे सदस्य नोंदणी अभियान लवकरच सुरू केले जाणार आहे. तसेच येत्या काळात सर्व सरचिटणीस, नेते मंडळींना कार्यकर्त्यांचे मेळावे आयोजित करावेत, अशी सूचना राज ठाकरेंनी या बैठकीत केली.  तर अयोध्या दौरा आणि भोंग्यांच्या आंदोलनाप्रश्नी पक्षाचे प्रवक्ते वगळता इतर कोणीही माध्यम प्रतिनिधी किंवा सोशल मीडियावर व्यक्त होऊ नये, अशी तंबी देखील त्यांनी शनिवारी सर्व पदाधिकाऱ्यांना दिली.

Share