उत्तर प्रदेशातील नानपारा-लखीमपूर महामार्गावर बसचा भीषण अपघात; ७ ठार

लखीमपूर खेरी : उत्तर प्रदेशातील नानपारा-लखीमपूर खेरी महामार्गावर नैनिहाजवळ रविवारी सकाळी एका भरधाव ट्रक आणि ट्रॅव्हल्स बसची समोरासमोर धडक झाली. या अपघातात ट्रॅव्हल्स बसमधील तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर चार जणांचा रुग्णालयात मृत्यू झाला. मृतांमध्ये चार पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे. या अपघातात नऊ प्रवासी जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

बहराईच जिल्ह्यात मोतीपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नानपारा-लखीमपूर खेरी महामार्गावरील नैनिहा गावाजवळ रविवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ट्रक आणि ट्रॅव्हल्स बसची समोरासमोर धडक होऊन हा भीषण अपघात घडला. या अपघातात तीन महिलांसह सात प्रवाशांचा मृत्यू झाला तर नऊ प्रवासी जखमी झाले. जखमींना बहराईच येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघातग्रस्त बसमधील प्रवासी कर्नाटकातून लखीमपूरमार्गे अयोध्येला जात होते, असे सांगण्यात येत आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही. पोलिस मृतांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. एसएसपी केशव कुमार चौधरी यांनी या अपघातात सात जणांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला पुष्टी दिली.

दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बहराईच जिल्ह्यात झालेल्या रस्ते अपघाताबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. मृतांच्या आत्म्याला शांती लाभो, अशी प्रार्थना करत मुख्यमंत्र्यांनी कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केली आहे.

Share