थिरूवअनंतपुरम : ‘माना हो तुम बेहद हसीन’ हे ‘टुटे खिलौने’ या हिंदी चित्रपटातील गाणे ऑर्केस्ट्रामध्ये सादर करतानाच प्रख्यात मल्याळी पार्श्वगायक एदवा बशीर हे स्टेजवर कोसळले. केरळ राज्यातील कोलम जिल्ह्यातील पाथिरापल्लीमध्ये ही घटना घडली. त्यांना तातडीने चेरथाला येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची प्राणज्योत मालवली. ते ७८ वर्षांचे होते. एदवा बशीर यांच्या अकाली निधनाने संगीत विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे.
एदवा बशीर हे दीर्घ काळापासून ब्ल्यू डायमंड ऑर्केस्ट्रामध्ये गाणी सादर करत होते. शनिवारी (२८ मे) केरळमधील कोलम जिल्ह्यातील पाथिरापल्ली येथे ब्ल्यू डायमंड ऑर्केस्ट्रा मंडळाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित ऑर्केस्ट्रा सुरू होता. यावेळी एदवा बशीर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रसिद्ध पार्श्वगायक येसुदास यांनी गायलेले ‘माना हो तुम बेहद हसीन’ हे हिंदी गाणं सादर करत असतानाच एदवा बशीर अचानक व्यासपीठावर कोसळले. त्यांना लगेचच चेरथला येथील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. रविवारी दुपारी कडप्पकड जुमा मशीद कब्रस्तान येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, एदवा बशीर यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.
संगीत विश्वातील मोठे नाव
एदवा बशीर हे मूळचे तिरुवनंतपुरममधील एडावा गावचे रहिवासी आहेत. शालेय जीवनापासूनच एदवा बशीर यांनी मल्ल्याळम संगीत विश्वात नाव कमावले होते. ख्यातनाम पार्श्वगायक येसूदास आणि मोहम्मद रफी यांची गाणी ऐकून बशीर यांनी प्रशिक्षणाला सुरुवात केली. ‘संगीतालय’ नावाचा म्युझिक ग्रुप सुरू केल्यानंतर ते प्रकाशझोतात आले. दुर्गामातेवर आधारित ‘अकसरुपिनी अन्नपूर्णेश्वरी’ या गाण्यासाठी रसिकांनी त्यांना डोक्यावर घेतले. अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांना हे गाणं सादर करण्याची मागणी चाहते करत असत. जगभरात अनेक ठिकाणी कार्यक्रम करत अमेरिका, यूके, युरोप, मध्य पूर्व देशांपर्यंत त्यांनी आपला आवाज पोहोचवला होता. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. त्यांनी अनेक चित्रपट गीते गायली; परंतु ते स्टेज परफॉर्मन्ससाठी प्रसिद्ध होते.
ഗായകൻ ഇടവാ ബഷീർക്കയ്ക്ക് ആദരാഞ്ജലികൾ. ആത്മാവിന് നിത്യശാന്തി നേരുന്നു 🙏#EdavaBasheer #KSChithra pic.twitter.com/92nzFqFx3h
— K S Chithra (@KSChithra) May 29, 2022
दिग्गजांकडून श्रद्धांजली
केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन आणि विरोधी पक्षनेते व्ही. डी. सतीशन यांनी एदवा बशीर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. सुप्रसिद्ध पार्श्वगायिका के. एस. चित्रा यांनीही ट्विटरवरून एदवा बशीर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.