श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये स्फोटकांनी भरलेले पाकिस्तानी ड्रोन रविवारी पहाटे भारतीय सुरक्षा दलाने जम्मू आणि काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यातील हिरानगर सेक्टरमध्ये उद्ध्वस्त केले आहे. सीमेपलिकडून अर्थात पाकिस्तानातून हे ड्रोन ऑपरेट करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. ड्रोन उद्ध्वस्त करण्यात आल्याने दहशतवाद्यांचा मोठा घातपाताचा प्रयत्न फसल्याचे बोलले जात आहे.
या ड्रोनला सात मॅग्नेटिक बॉम्ब आणि यूबीजीएल (अंडर बॅरल ग्रेनेड लॉन्चर) ग्रेनेड्स लावण्यात आले होते. पाकिस्तानी सीमेतून या ड्रोनने भारतीय हद्दीत प्रवेश केला होता. हा प्रकार लक्षात आल्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी गोळीबार करत हे ड्रोन खाली पाडले आहे. याबाबत अधिक माहिती देताना कठुआ जिल्ह्याचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक मुकेश सिंग म्हणाले, कठुआ जिल्ह्यातील राजबाग पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तल्ली हरिया चक परिसरात ड्रोनच्या हालचाली वाढल्या होत्या. यामुळे दररोज सकाळी पोलिसांचे एक पथक या भागात नियमितपणे पाठवले जात होते. आज रविवारी पहाटे सुरक्षा दलाच्या या पथकाने पाकिस्तानी सीमेतून एक ड्रोन येत असल्याचे पाहिले. त्यानंतर त्यांनी त्वरित ड्रोनच्या दिशेने गोळीबार केला.
J&K | Security forces shoot down a drone in Talli Hariya Chak under Rajbagh PS in Kathua Dist.
7 UBGLs (Under Barrel Grenade Launcher)& 7 sticky/magnetic bombs recovered from payload attached to the Hexacopter; further analysis underway. Bomb Disposal Squad present: SSP Kathua pic.twitter.com/rO3YE0m7OV
— ANI (@ANI) May 29, 2022
सुरक्षा दलाला हे पाकिस्तानी ड्रोन खाली पाडण्यात यश आले आहे. या ड्रोनसोबत सात चुंबकीय (मॅग्नेटिक) बॉम्ब आणि सात यूबीजीएल (अंडर बॅरल ग्रेनेड लॉन्चर) ग्रेनेड जप्त करण्यात आले आहेत. घटनास्थळी बॉम्ब निकामी पथकाने जाऊन पाहणी केली. पुढील तांत्रिक तपास केला जात आहे. विशेष म्हणजे हरिया चक हा परिसर पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या घुसखोरीसाठी नेहमीच पसंतीचा मार्ग राहिला आहे. सीमावर्ती भागात दहशतवाद्यांकडून अशा छुप्या पद्धतीनं आपली कारस्थान सुरू असतात. यामध्ये आता ड्रोनसारख्या अत्याधुनिक उपकरणांचा वापरही वाढला आहे. ३० जूनपासून अमरनाथ यात्रेला सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर अमरनाथ यात्रेच्या मार्गक्रमणावर सुरक्षा वाढवली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. आज घडलेल्या या घटनेमुळे सुरक्षा दले सतर्क झाली आहेत.