किरीट काकांना राज्यसभेवर न घेतल्याने भारतातील सामान्य जनता…

मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने केंद्रीय मंत्री पियुष गोयल, राज्याचे माजी मंत्री अनिल बोंडे आणि कोल्हापूरचे माजी खा. धनंजय महाडिक यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या राज्यसभा उमेदवारी चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. यावरूनच राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्वीट करत त्यांना डिवचले आहे.

किरीट सोमय्यांचा एक हसरा फोटो ट्विट करत अमोल मिटकरींनी त्यांच्यावर उपहासात्मक टीका केलीय. “तथ्यहिन घोटाळे बाहेर काढताना रात्रंदिवस घसा ओरडुन ओरडुन रोज पत्रकार परिषदा घेणाऱ्या किरीट काकांना राज्यसभेवर न घेतल्याने भारतातील सामान्य जनता नाराज झाली अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे,” अशा कॅप्शनसहीत हा फोटो मिटकरींनी ट्विट केलाय.

राज्यसभेच्या ५७ जागांसाठी १० जून रोजी निवडणूक होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पुन्हा कर्नाटकमधून उमेदवारी देण्यात आली आहे. उत्तर प्रदेशमधून सर्वाधिक ११ जागा रिक्त होत आहेत. केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांची मुदत संपुष्टात येत असली तरी रविवारी जाहीर झालेल्या यादीत नक्वी यांचा समावेश नाही. तसेच, सध्या राज्यसभेतील प्रतोद शिवप्रताप शुक्ल यांचेही नाव सहा उमेदवारांच्या यादीत नाही.

Share