बुरखा घालून ज्वेलर्सच्या दुकानात चोरी करणाऱ्या महिला गुन्हे शाखेच्या ताब्यात

औरंगाबाद :  बुरखा घालून ज्वेलर्सच्या दुकानात, दुकानदारांची नजर चुकवत सोन्याचे दागिने चोरणाऱ्या दोन बुरखाधारी महिलांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. बुशरा प्रवीण अब्दुल गफूर खान उर्फ बुशरा परवीन शेख नईम (वय ३५, रा. ग्रीनव्हॅली, रोजबाग, औरंगाबाद), मुन्नी बेगम हसन खान (वय ३०, रा. गल्ली क्र-१, संजयनगर, औरंगाबाद) अशी त्यांची नावे आहेत.

यासंबंधी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, शहरातील नामांकीत पीएनजी ज्वेलर्स (एन-३, सिडको), वामन हरी पेठे ज्वेलर्स (समर्थनगर), सावंत ज्वेलर्स (त्रिमूर्ती चौक) आणि रिलायन्स ज्वेल्स (रिलायन्स मॉल, गारखेडा) आदी दुकानांत सोने खरेदीच्या बहाण्याने जाऊन आरोपी बुरखाधारी महिलांनी सेल्समनची नजर चुकवून एक ते दोन तोळे दागिन्यांवर डल्ला मारला होता, विविध चार दुकानांमध्ये या घटना घडल्या. मात्र, आरोपींचा काहीही थांगपत्ता लागत नव्हता. त्यामुळे गुन्हे शाखेने सहायक निरीक्षक मनोज शिंदे, उपनिरीक्षक अजित दगडखैर यांच्या पथकाला समांतर तपासाचे काम दिले. त्यांनी सेफसिटीचे २२४ आणि खासगी ७५ असे तब्बल २९९ सीसीटीव्ही तपासले. यातून चोरी केल्यावर महिला काय करतात?, कुठे जातात? यासारख्या अनेक बाबींची माहिती गोळा केली.

रिलायन्स ज्वेलर्समध्ये १९ मे रोजी बुशरा आणि मुन्नी यांनी डल्ला मारला होता. या घटनेनंतर पोलिसांनी सीसीटीव्हीचा बारकाईने अभ्यास केला. त्यात सहा रिक्षा बदलून त्या एका ठिकाणी उतरल्या. तेथून रोजाबागकडे जाण्यासाठी बुशराने दुचाकी घेऊन तिच्या मुलाला बोलावले. बुशराने बुरखा घातलेलाच होता, मात्र तिच्या मुलाचा चेहरा उघडा होता. नेमका तोच फायदा गुन्हे शाखेला मिळाला. त्यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे थेट बुशराचे घर गाठले. पोलिसांनी खाक्या दाखविताच बुशरा बोलू लागली. तिनेच मुन्नीचे नाव सांगितल्यावर दोघींनाही अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून एकूण ३७,३१० ग्रॅम सोने आणि एक मोबाईल असा ऐवज पोलीसांनी जप्त केला.

 

Share