मुक्ता बर्वेच्या ‘वाय’ चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : अजित सूर्यकांत वाडीकर दिग्दर्शित ‘वाय’ (Y) हा मराठी चित्रपट येत्या २४ जून रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. या थरारपटात प्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे प्रमुख भूमिकेत आहे. मुक्ता बर्वेने हातात मशाल धरलेले ‘वाय’ या चित्रपटाचे आगळेवेगळे असे पोस्टर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित करण्यात आले. मशाल घेऊन नक्की ती कोणासोबत लढत आहे याचे विविध अंदाज अजूनही लावले जात आहेत. आता ‘Y’ चित्रपटाचा टीझरही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘वाय’ चित्रपटाचा थरारक टीझर सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.

अतिशय थरारक अशा या टीझरमध्ये झोपेतून अचानक जागे झालेल्या मुक्ताच्या दिशेने एक अक्राळविक्राळ कुत्रा गुरगुरत झेपावताना दिसत आहे. हा कुत्रा मुक्ताकडे का झेपावत आहे? नक्की काय घडतेय? कशासाठी घडतेय? असे प्रश्न आपणास नक्कीच पडले असतील. अर्थात या सर्व प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यावर कळणार आहेत.

https://www.instagram.com/reel/CeK1FZgqrnr/?utm_source=ig_web_copy_link

कंट्रोल एन प्रॉडक्शन्स निर्मित ‘वाय’ (Y) या चित्रपटाची कथा अजित सूर्यकांत वाडीकर यांची असून, पटकथा व संवाद अजित वाडीकर, स्वप्नील सोज्वळ व संदीप दंडवते यांनी लिहिलेले आहेत. या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते विराज विनय मुनोत आहेत. मुक्ता बर्वे म्हणजे मराठी अभिनयसृष्टीला गवसलेला एक हिराच म्हणावा लागेल. तिने आजपर्यंत अनेक मालिका, नाटक, सिनेमा अशा सगळ्याच प्लॅटफॉर्मवर साकारलेल्या भूमिकांनी रसिकांच्या काळजाला थेट हात घातला आहे. त्यामुळे तिच्या सिनेमाची चर्चा तर होणारच. मुक्ताच्या आगामी ‘वाय’ (Y) या सिनेमाचा टीझर मात्र खूप वेगळे संकेत देत आहे, उत्सुकता वाढवताना दिसत आहे.

या चित्रपटाच्या उत्कंठापूर्ण प्रमोशनची आणि ‘वाय’ या शिर्षकाची चर्चा सर्वत्र सुरू असताना या टीझरने कुतुहलात आणखी भर पडली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक अजित सूर्यकांत वाडीकर म्हणतात, ”वाय’ या शीर्षकामागे खूप मोठा अर्थ दडलेला आहे. ‘वाय’ ही आपल्या सर्वांच्या अस्तित्वाची, अस्तित्वासाठीच्या संघर्षाची कहाणी आहे. या टीझरचा आणि ‘वाय’ या नावाचा अर्थ तुम्हा सर्वांना जाणून घ्यायचा आहेच आणि त्यासाठी ‘वाय’ नक्की म्हणजे नक्की पहा.”

Share