पंजाब : प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला पंचत्वात विलीन झाला आहे. मानसा जिल्ह्यातील मूसागाव येथील शेतात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अत्यंसंस्कारापूर्वी सिद्धूची अत्यंयात्रा काढण्यात आली होती. त्याच्या आवडत्या ट्रॅक्टरवरुनच ही अंत्ययात्रा काढण्यात आली होती. मुसेवालाच्या अंत्ययात्रेत त्यांचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती.
अंत्ययात्रेत सिद्धू मुसेवालाचे आई-वडील खूप भावूक झाले होते. वडिलांनी रडत रडत आपली पगडी काढली आणि मुलाला इतके प्रेम दिल्याबद्दल उपस्थित लोकांचे आभार मानले. अखेरच्या प्रवासात आईने आज शेवटच्या वेळी मुलाच्या डोक्यावरून हात फिरवला आणि वडिलांनी पगडी बांधली. शवपेटीमध्ये ठेवलेल्या मुलाकडे दोघेही एकटक पाहत राहिले. हे पाहून उपस्थित लोकांचे डोळे भरून आले.
अनेक स्तरातून शोक व्यक्त, सरकारविरोधात रोष
दरम्यान, सिद्धूच्या हत्येनंतर विविध स्तरातून तीव्र प्रतिक्रिया आल्या होत्या. भारतातील मनोरंजन क्षेत्रासह परदेशातूनही मुसेवालाच्या मृत्यूची बातमी धक्कादायक असल्याचं सांगताना अनेकांनी शोक व्यक्त केला. कॅनडातील कॉमेडियन लिली सिंह ने देखील आपल्या इन्स्टावर सिद्धूला श्रद्धांजली वाहिली आणि पंजाबी संगीत क्षेत्रातील तरुण कलाकाराची हत्या झाल्याबद्दल शोक व्यक्त केला. मुसेवालाच्या अंत्यसंस्काराच्या ठिकाणी पंजाब सरकार मुर्दाबादच्या घोषणा दिल्या गेल्या. त्याची सुरक्षा काढून माहिती सार्वजनिक केल्याबद्दल चाहते सरकारवर नाराज आहेत.