रुग्णालयातून कुत्र्याने कापलेला हात पळवल्याने रुग्णाला कायमचे अपंगत्व

सिलीगुडी : अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका व्यक्तीचा हात कोपऱ्यापासून वेगळा झाला. या व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, या व्यक्तीचा तुटलेला हात एक कुत्रा रुग्णालयातून घेऊन पळाला. रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे या व्यक्तीला आयुष्यभरासाठी अपंग होण्याची वेळ आली आहे. पश्चिम बंगालमधील सिलीगुडी येथे ही खळबळजनक घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री सिलीगुडी येथील फूलबाडी जंक्शनवर टी-पार्कजवळ झालेल्या अपघातात संजय नावाचा तरुण गंभीर जखमी झाला. गंभीर जखमी अवस्थेत संजय यांना त्वरित सिलीगुडी येथील नॉर्थ बंगाल मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. रुग्णालयातील अपघात वॉर्डमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. अपघातात संजय यांचा हात कोपरापासून वेगळा झाला होता. ऑपरेशन करून हा हात पुन्हा जोडता येऊ शकतो, असे डॉक्टरांनी सांगितले. प्राथमिक उपचारानंतर संजय यांचा तुटलेला हात एका बॅगेत पॅक करून ऑर्थोपॅडिक सर्जरी विभागात पाठवण्यात आला. मात्र, यानंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी कापलेला हात सांभाळून ठेवला नाही. रात्री उशिरा शस्त्रक्रियेसाठी तयारी करण्यात आली.

रुग्ण संजय यांना शस्त्रक्रियेसाठी वॉर्डात दाखल केल्यानंतर अर्धवट कापलेला हात सापडत नव्हता. यानंतर शोध सुरू करण्यात आला तेव्हा त्यांचा हात गायब झाल्याचे समोर आले. एक कुत्रा रुग्णालयात शिरून अपघातग्रस्त व्यक्तीचा हात घेऊन गेला होता. बराच वेळ शोधाशोध केल्यानंतर गच्चीवर एक कुत्रा कापलेला हात चावताना दिसला. बरेच प्रयत्न करूनही कुत्र्याच्या तोंडातून हात घेता आला नाही. सोमवारी हा प्रकार उघड होताच एकच खळबळ उडाली.

रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणाची माहिती मिळाल्यानंतर रुग्णाच्या कुटुंबीयांनी सोमवारी सकाळी नॉर्थ बंगाल मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलच्या अधीक्षकांना याचा जाब विचारला आणि रुग्णालयात आंदोलन केले. आता या प्रकरणात नॉर्थ बंगाल मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांनी तपासासाठी समिती नेमली आहे. केवळ रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे या तरुणाला कायमचे अपंगत्व आले आहे.

Share