पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची उद्या औरंगाबाद येथे जाहीर सभा होणार आहे. तत्पुर्वी राज ठाकरे पुण्यातील राहात्या घरातून औरंगाबादच्या दिशेने रवाना झाले आहेत. यावेळी राज ठाकरेंच्या पुण्यातील निवासस्थानी मनसेचे मुंबई, पुण्यातील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली होती. मात्र यासर्वांमध्ये पुण्याचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे कुठेच दिसत नसल्याचं आढळून आलं आहे. अशात आता वसंत मोरे यांची फेसबुक पोस्ट समोर आली आहे.
मनसेच्या काही नेत्यांकडून वसंत मोरे हे आजारी असल्याचे सांगितले जात होत. त्य़ानंतर स्वत: मोरेंनी फेसबुक पोस्ट करुन सांगितलं. तसेच त्यांच्याबद्दल अफवा पसरवणाऱ्या राजकीय विरोधकांचा त्यांनी समाचार घेतला आहे. त्यांनी म्हटले आहे की, मी एकदम ठणठणीत आहे. माझ्या तब्येतीची काळजी करणाऱ्यांनी स्वतःची काळजी घ्यावी कारण बाहेर ऊन खूप आहे ते सहन होणार नाही. मी उद्या श्री.छत्रपती संभाजी महाराज नगरला येतोय…! यासोबतच वसंत मोरे यांनी व्हिडिओ सुद्धा शेअर केले आहे.
दरम्यान वसंत मोरे यांची पुणे शहर अध्यक्ष पदावरून उचलबांगडी केल्यानंतर साईनाथ बाबर यांना पुणे शहराची सूत्र देण्यात आली. त्यावरही वसंत मोरे नाराज झाले होते. या कालावधीत इतर राजकीय पक्षाकडून पक्ष प्रवेशाच्या ऑफर आल्याचं त्यांनी म्हटलं होतं. मात्र त्यानंतर वसंत मोरे यांनी मुंबईत येऊन राज ठाकरे यांची भेट घेतली आणि आपण पक्ष सोडणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. हा सर्व घटनाक्रम पाहता राज ठाकरे पुण्यात आले असतानाही वसंत मोरे गैरहजर राहिले आहेत. त्यामुळे वसंत मोरे यांनी मनसेला रामराम तर केला नाही ना असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होत आहे.