वर्धा- संपूर्ण महाराष्ट्राला हादरून टाकणाऱ्या प्रकरणावर आज महत्वपूर्ण सुनावणी पार पडली. सरकारी वकील उज्वल निकम यांच्या युक्ती वादाने पीडीतेच्या कुटुंबीयांना न्याय मिळाल्याच म्हंटल जात आहे. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपी विकेश नगराळे याला दोषी ठरवलं आहे. न्यायालय उद्या आरोपीला शिक्षा सुनावणार असल्याची माहिती सरकारी वकील उज्वल निकम यांनी दिली.
आरोपीला चोख पोलीस बंदोबस्तात न्यायालयात हजर करण्यात आले होते . यावेळी सरकारी पक्षाचे वकील ॲड उज्वल निकम, आरोपी पक्षाचे वकील ॲड भूपेंद्र सोने न्यायालयात हजर झाले. याचसोबत पीडितेचे आई-वडीलदेखील न्यायालयात दाखल झाले होते. याठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आरोप सिद्ध झाले असून या जळीतकांड प्रकरणात आरोपी दोषी ठरविण्यात आला आहे. आता या खटल्याचा निकाल उद्या गुरुवारी १० फेब्रुवारीला येणार असल्याची माहिती सरकारी वकील ॲड उज्वल निकम यांनी दिली आहे.
काय आहे प्रकरण?
३ फेब्रुवारी २०२० रोजी आरोपी विकेश नगराळेनं एकतर्फी प्रेमातून शिक्षिकेला पेटवलं होतं. १० फेब्रुवारीला तिचा मृत्यृ झाला होता. या घटनेनंतर महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती. आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी सर्वांकडून होत होती. पोलिसांकडून याप्रकरणी ४२६ पानांचं दोषारोपपत्र, ६४ सुनावणी आणि २९ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. पीडित तरुणीच्या मृत्यूला दोन वर्ष पूर्ण होत असून तिच्या स्मृतीदिनीच कोर्ट शिक्षेची सुनावणी करणार आहे.