मुंबई- अभिनेत्री उर्मिला मातोंडकर ही नेहमीच चर्चेत असते. उर्मिलाने तिच्या मेहनतीच्या जोरावर अभिनय क्षेत्रात उत्तम स्थान निर्माण केले आहे. तिच्या कारकिर्दीत बॉलिवूडमध्ये भरपुर चित्रपटात तिने काम केले आहे. पण सिनेसृष्टीच्या सुरुवातीला करिअरसाठी तिने खूप संघर्ष केला आहे. ‘मासूम’ चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले. पण तिला ओळख ‘रंगीला’ चित्रपटातून मिळाली. नुकतंच एका मुलाखतीत उर्मिलाने या चित्रपटाबाबत खंत व्यक्त करत धक्कादायक खुलासा केला आहे.
एका मुलाखतीत उर्मिला म्हटलं की, “ मी खूप संघर्ष केला आहे, मला माझ्या संघर्षाचे दिवस आठवले की भारावून जाते. मी माझे फोटो कधीही कोणत्याही निर्मात्याकडे दाखवण्यासाठी नेले नाहीत. माझ्या कुटुंबाचा चित्रपटसृष्टीशी दूरदूरपर्यंतचा संबंध नव्हता. मी मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. पण जे व्हायचे होते तेच घडते.” “त्यावेळी मला नरसिंह या चित्रपटात भूमिका मिळाली होती. मात्र त्या चित्रपटात भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीला फ्रॅक्चर झाल्यानेच मला त्या चित्रपटासाठी साईन करण्यात आले होते. या चित्रपटाचा क्लायमॅक्स शूट होणार होता. या गाण्यातील एका डान्ससाठी 500 ज्युनियर आर्टिस्ट आले होते. मला तो डान्स करणे भाग होते. मी डान्सचं प्रशिक्षणही घेतलं नव्हतं. मात्र मी परफॉर्म करण्यापूर्वी त्यांनी मला नकार दिला होता,” असे उर्मिलाने सांगितले.