नागपुरात होणार एरो मॉडेलिंग शो – क्रीडा मंत्री केदार

नागपुर : राज्यामध्ये अनेक वर्षांनंतर प्रथमच नागपूर येथे एरो माॅडेलिंग शोचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थांना सैन्यदलातील प्रात्यक्षिके पाहायला मिळणार आहे. क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी ही माहिती दिली.  मुंबई येथे मंत्रालयात एरो मॉडेलिंग शो विषयी आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस क्रीडा विभागाचे आयुक्त प्रकाश बकोरिया हे दूरदृश्य प्रणालीव्दारे उपस्थित होते. कर्नल अमित बाली, ब्रिगेडीअर लाहिरी, कॅप्टन सतपाल सिंग यांची उपस्थिती होती.

क्रीडा मंत्री सुनिल केदार म्हणाले की, आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत नागपूर शहरातील मोठ्या मैदानात हजारो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत मोठ्या आकाराचे विमाने (मानव विरहीत) उडविण्यात येणार आहेत. हा शो पाहण्यासाठी राज्यातील विविध ठिकाणाहून विद्यार्थी येणार आहेत. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या शोचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. हा शो क्रीडा विभाग, एनसीसी आणि सैन्य दल यांच्या संयुक्त विद्यमाने होत आहे. विद्यार्थ्यांना एरो मॉडलिंग विषयी माहिती होऊन त्याबद्दलचे आकर्षण त्यांच्यामध्ये निर्माण होईल. अशा उपक्रमामुळे सैन्यदलाविषयी, विद्यार्थ्यांना माहिती मिळणार असल्याचे सुनील केदार यांनी यावेळी सांगितले.

Share