मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची काल मंगळवारी ठाण्यात ‘उत्तर’ सभा झाल्यानंतर त्यांच्या निवासस्थानी अनेक पक्षांच्या नेत्यांची ये-जा वाढली असून, भाजपचे नेते कृपाशंकर सिंह आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांचे चिरंजीव पंकज भुजबळ यांनी आज राज ठाकरे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
ठाण्यात काल राज ठाकरे यांची ‘उत्तर’ सभा पार पडली. या सभेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, शरद पवारांच्या कन्या खा. सुप्रिया सुळे, मंत्री जयंत पाटील, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड यांच्यासह शिवसेना नेते खा. संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली होती. या सभेत छगन भुजबळांवर हल्लाबोल करताना राज ठाकरे म्हणाले होते की, भुजबळ यांच्या संस्थेतील आर्थिक गैरव्यवहारामुळे भुजबळांना जेलमध्ये जावे लागले. दोन-अडीच वर्षे जेलमध्ये गेल्यानंतर मंत्रिपदाची शपथ घेणारे भुजबळ हे पहिले नेते होते, अशी टीका राज यांनी केली होती. ठाण्यातील ‘उत्तर’ सभेच्या दुसऱ्याच दिवशी छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांनी सपत्नीक राज ठाकरे यांच्या मुंबईतील शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन भेट घेतली. राज ठाकरे यांना नुकताच नातू झालेला आहे. त्यामुळे भुजबळ यांनी सपत्नीक त्यांची सदिच्छा भेट घेतल्याचे सांगितले जात आहे.
आमच्यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही -कृपाशंकर सिंह
भाजपचे नेते कृपाशंकर सिंह यांनीही आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याने मनसे आणि भाजपची लवकरच युती होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. दरम्यान, मी नातीच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी राज ठाकरे यांना भेटायला गेलो होतो. या भेटीत आमच्यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे कृपाशंकर सिंह यांनी स्पष्ट केले आहे.
सध्या राज ठाकरे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर अधिक जोर देताना दिसत आहेत. मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात त्यांनी शिवसेनेसह राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती. त्यानंतर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीही ९ एप्रिल रोजी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यातच कालच्या ठाण्यातील सभेत राज यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेवर विखारी टीका केली होती; पण भाजपवर टीका करणे टाळले होते. या सगळ्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजप-मनसे युती होणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे.