औरंगाबाद : भाजपने विधान परिषदेसाठी पंकजा मुंडे यांना डावललं आहे. त्यामुळे आता पंकजा मुंडे यांचे समर्थक चांगलेच आक्रमक झाले आहेत. औरंगाबादमध्ये पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी भाजप कार्यालयाची तोडफोड करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनीच पंकजा मुंडेंवर अन्याय केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आला आहे.
भाजपने बुधवारी विधानपरिषद निवडणुकीसाठी पाच उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. मात्र या यादीत पंकजा मुंडे यांना स्थान देण्यात आलं नाही. ‘विधानपरिषदेत संधी मिळाल्यास मी चांगलं काम करून दाखवेन’, असं म्हणत पंकजा मुंडेंनी अप्रत्यक्षरीत्या उमेदवारीची अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र पंकजा मुंडे यांच्याऐवजी भाजप नेतृत्वाने इतर पक्षातून भाजपवासी झालेल्या उमेदवारांवर विश्वास दाखवला. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीर पंकजा मुंडे यांच्या समर्थकांकडून विविध शहरांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
शहरातील उस्मानपुरा भागातील भाजप कार्यालयासमोर पंकजा मुंडे यांच्या समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पंकजा मुंडे यांना तिकीट मिळालं नाही म्हणून भाजपच्या कार्यालयाची तोडफोड करण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतलं आहे. यावेळी कार्यालयाबाहेर मोठा गोंधळ झाल्याचं पहायला मिळालं.