मुंबई : सततच्या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांची खरीप व रब्बी ही दोन्ही पिके वाया गेली असून सरकारने ओला दुष्काळ करावा, तसेच तातडीची मदत जाहीर करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत केली.
अजित पवार म्हणाले की, ‘राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. दुसरीकडे पुन्हा एका चक्रीवादळाचे संकट उभे ठाकले आहे. सततच्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना तत्काळ मदत करण्याची गरज आहे. सरकारकडे विरोधी पक्षाच्या वतीने मागणी करणार आहे, यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची वेळ मागितली आहे. त्यांच्याकडे हा विषय मांडणार आहे.
राज्यात यंदा पावसाळी हंगामात आणि परतीच्या पासवामुळे झालेले खरीप आणि आगामी रबी हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे. पावसाचा अंदाज पाहता मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांनी तातडीने सतर्क होण्याची मागणी विधासभा विरोधी पक्षेनेते @AjitPawarSpeaks यांनी केली. pic.twitter.com/mWSV5UQ7Uz
— NCP (@NCPspeaks) October 18, 2022
मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते, त्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करू, असे सरकारने सांगितले होते. मात्र अद्याप पैसे जमा केलेले नाहीत. पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. या प्रश्नात मुख्यमंत्र्यांनी तातडीने लक्ष घालावे. राज्यभरात शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. काही लोकांच्या घरात पाणी भरले आहे त्यांना तत्काळ धान्याची मदत द्यावी. राज्य सरकारमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना तसे आदेश देण्यात आले तरच लोकांना दिलासा मिळेल, असेही ते म्हणाले.