औरंगाबाद : शहरातील जालना रोडवरील वर्दळ आणि वाहनांचा राबता लक्षात घेता या रस्त्याने मोकळा श्वास घ्यावा, याकरीता पोलिस आयुक्तांनी जालना रोडवरील आकाशवाणी आणि दूध डेअरी चौकातील (हॉटेल अमरप्रीत चौक) सिग्नल बंद करुन दोन्ही रस्त्यावरुन ये-जा करणारे रस्त्यावर बॅरीकेडस लावत वाहतूक बंद केलेली आहे.
मात्र, काही दिवसांपासून वाहनांना आडवे जात नागरिकांची बॅरिकेड्स मधूनच ये-जा सुरु असते. काही दिवसांपूर्वी रस्ता ओलांडताना एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची घटना देखील घडली होती. शिवाय बॅरिकेड्स लावण्यात आल्यामुळे वाहनचालकांची मोठ्या प्रमाणत गैरसोय होत आहे. त्यामुळे हा सिग्नल सुरु करुन वाहतूक खुली करावी, अशी मागणी करीत जवाहरनगर नागरिक कृती समितीतर्फे स्वाक्षरी मोहिम सुरु करण्यात आली आहे.
नागरिकांनीही या मोहिमेला प्रतिसाद देत पहिल्या दिवशी तब्बल १७० नागरिकांनी स्वाक्षऱ्या केल्या. स्वाक्षऱ्यांचे निवेदन पोलिस आयुक्तांना देण्यात आले. निवेदनावर सतीश साखरे, रमेश परळीकर, आशिष राठोड, नंदकुमार गवळी, बाळासाहेब दाभाडे, हेमंत पटेल, संदीपान थोरात, अतिक अली, नरेंद्र भोसले, गणेश दीक्षित, अनिल विधाते, गोपाल पांढरे, नाना माकोडे, सुरेश हिवाळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.